मराठवाड्यातील संतकवी बसवदास

1 min read

महात्मा बसवण्णांवर अभंगरचना करणारेे संतकवी बसवदास.  इ. स. १९०३ ते १९२३हा बसवदासांच्या प्रत्यक्ष कार्याचा काळ. मराठवाड्यातील नांदेडमधील हणेगावचे ते रहिवासी होते.  त्यांचा जन्म माघ शु. पंचमी शके १८०८ म्हणजेच २९ जानेवारी, १८८७ रोजी शनिवारी प्रातःकाळी झाला.

त्यांचे आयुष्यमान ३७ वर्षे होते. इ. स. १९०८ ते १९२१ या अल्पकाळात त्यांनी विपुल साहित्य निर्मिती केली. त्यांनी भजन, कीर्तन, पारायण करून स्वधर्माचा प्रसार केला. त्यांचे मूळ नाव गुरुपादप्पा. पिता चेन्नबसवप्पा शेटकार होय. आईचे नाव नागम्मा. पत्नीचे नाव चंगळेव्वा, या पत्नीच्या मृत्यूनंतर कल्लव्वा हिच्याशी विवाह झाले. त्यांच्यापासून त्यांना बसम्मा नावाची कन्या प्राप्त झाली. बसम्माचे लग्न हणेगावच्या पटणे घराण्यात झाला.

बसवदासांचे शिक्षण उर्दू सातव्या इयत्तेपर्यत झाले. मराठी, कन्नड, मोडीलिपीवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी पद्मरचनेत ओव्या, भारुडे, आरत्या, पदे, अष्टके, श्लोक तर गद्यरचनेत आत्मचरित्र लिहिले आहे. ९ फेब्रुवारी १९१० रोजी त्यांनी बसवदास नाव धारण केले. १९१० पूर्वी त्यांनी गुरुपाद नावाने रचना केली आहे.  बसवदास नाव  धारण करण्याविषयी ते एका अभंगात लिहितात-

पृथ्वीतलावरी, संत झाले भारी ।
ऐका त्यांची परी, सविस्तर ।।१।।
कोणी शिवदास, कोणी रामदास ।
कोणी विष्णुदास, झाले संत ।।२।।
दासांची विनंती, ऐका हो सद्गुणी ।
नाही झाले कोणी, बसवदास ।।३।।
म्हणुनी गुरुपाद, बसवदास झाला ।
देह हा अर्पिला, बसवपदी ।।४।।

संत बसवदास म्हणतात, पृथ्वीवर अनेक संत जन्मले त्यात  कोणी शिवदास, कोणी रामदास तर कोणी विष्णुदास झाले पण आजपर्यत कोणीही बसवदास झाला नाही, म्हणून गुरुपाद स्वतः बसवदास नाव धारण करतो असे बसवदास लिहितात. यावरून त्यांनी महात्मा बसवण्णाविषयी निष्ठा दिसून येते.

बसवदासांची साहित्य रचना

श्री बसवदास कृत प्रभुलिंगलीला, मांमथस्वामी, संतचरित्र आणि बोध यावर अभंग, श्री बसवेश्वर- पाळणा, बसवण्णा आणि मन्मथस्वामींच्या आरत्या, भारुडे, अष्टके, ओवीरूप मन्मथलीला, गद्यरूप आत्मचरित्रात कपिलाधार वाऱ्यांचा वृत्तांत या रचना बसवदासांनी केल्या.
त्यांनी लिहिलेल्या एकूण अभंगाची संख्या १२५२, पाळणा १, आरत्या ३५, पदे २१, भारुडे ७०, अष्टके  ९, श्लोक ७०, ब्रीदावली ७, एकूण साहित्य रचना १४६५ इतकी आहे.  त्यांनी केलेल्या अभंग रचनेत मंगलचरण, शिवगुरुदास, शिव , बसव,  प्रभूलिंगलीला, मन्मथ, संत, बोध, शिवगीतासारामृत आणि आत्मकथा याविषयांवर अभंगरचना केली आहे. त्यांच्या अभंगात महात्मा बसवण्णा, मादिराज, मादलांबिका, अक्कनागाई, चन्नबसवेश्वर, गंगाबिका, निलांबिका, माचीदेव, चिक्कण्णा, अप्पण्णा आणि बिज्जल यांचीही ते आठवण करून देतात.  त्यांच्या साहित्यावर वारकरी संत ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव या संतांच्या अभंगवाणीचा प्रभाव आहे. त्यांनी मन्मथस्वामी, शिवदास, लिंगेश्वर, बसवलिंग बाळाबुवा कबाडी, शिवगुरुदास यांच्या अभंगवाणीचा सखोल अभ्यास केला.  त्यांनी श्रीबसवाष्टक, श्रीअष्टावरणष्टक, श्रीमन्मथाष्टक, श्रीमुरगेद्रष्टक, श्रीलिंगधर्मप्रकाशाष्टक अशी ६ अष्टके लिहिली.

ओव्या- श्रीबसवस्तोत्र- बसवदास हे थोर बसवभक्त होते. ते बसवपुराण व बसववचनांचे पारायण करत असत.  महात्मा बसवेश्वरांचे दास म्हणून त्यांनी  बसवदास नाव धारण केले. याशिवाय श्रीबाळलिंग व शिवलिंग चरित्र , बसवदासकृत आत्मचरित्र त्यांनी लिहिले.
बसवदासांनी महात्मा बसवण्णांच्या चरित्रावर शिवदासांच्या शिवपाठाप्रमाणे बसवपाठ लिहिला आहे. त्यात एकूण २९ अभंग आहेत. याशिवाय महात्मा बसवण्णांची पदे आणि आरत्या त्यांनी लिहिल्या.  बसवदासांवर बसवादि शरणांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. बसवदासांनी अल्लमप्रभु, चेन्नबसवेश्वर, बसवण्णा, गंगाबिका, निलांबिका, अक्कनागाई, मुक्तायक्का- अजगण्णा या शरणांवर अनेक अभंग, स्तुती, पदे लिहिली आहेत.

भारतातील पहिल्या बसवजयंतीचे जनक श्री बसवदास

हणेगाव येथे सौ. निंबव्वा रावणगावे यांच्या घरी ९ मे, १९१२ पहिली  बसवजयंती त्यांनी साजरी केली.  ११ फेब्रुवारी १९१३ रोजी दुसरी बसवजयंती, ३१ जानेवारी, १९१४ रोजी तिसरी, २८ एप्रिल, १९१४ रोजी चौथी बसवजयंती साजरी केली.  १० मे, १९१३ रोजी दावणगेरे या नगरी विरक्तमठाचे मठाधिपती श्रीगुरु मृत्युंजयस्वामी यांच्या प्रेरणेने कर्नाटक गांधी शरण मंजप्पा हर्डेकर यांनी विरक्त मठात बसवजयंती साजरी केली.

संदर्भ:

बसवदास गाथा- दौ.  अ. साखरे

मराठी लिंगायत संत साहित्यातील बसवण्णा – संपादक राजू जुबरे.

सौजन्य: अभिषेक देशमाने


वरील लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची स्वतःची आहेत. सर्वाधिकार व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
आद्य क्रांतिकारक, युगप्रवर्तक, जगतज्योती, समतानायक, महात्मा बसवण्णा

प्राचीन भारताचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात, दक्षिण भारताचा इतिहास समृद्ध आहे. मध्ययुगीन बारावे शतक हे

Close