कल्याणक्रांती विजयोत्सव तथा बसव धर्म विजयोत्सव

1 min read
उड्डाण पंखो से नही, होसलो से होती है…!!!
इतिहासात नाव कोरण्यासाठी चंदनासारखं झिजव लागते, अगरबत्तीसारख जळाव लागतं, पाण्यासारख दुसऱ्यासाठी वाहवे लागते, सुर्यासारखे सातत्य ठेवावे लागते. अशीच इतिहासात नाव कोरून ठेवणारी एक घटना कल्याण राज्यात म्हणजे सध्याच्या कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथे घडली. बसवण्णांच्या अनुभवमंटपात हरळय्या नावाचे शरण होते, चांभारकामाचे कायक ते करत होते. त्यांची पत्नी कल्याणीम्मा आणि पुत्र शीलवंत हेदेखील कल्याणच्या अनुभवमंटपाचे शरण होते. बसवण्णा आणि हरळय्या दोघेही एकमेकांचे जीवाभावाचे संगाती बनले.
बसवण्णांच्या विचाराने प्रभावित होऊन शरण बनलेले हरळय्या एकदा बसवण्णांना आपल्या घरी प्रसादासाठी आमंत्रित करतात. हरळय्यांच्या विनंतीला मान देऊन बसवण्णा हरळय्यांच्या घरी प्रसादासाठी गेले. हरळय्यांनी त्यांचे आदरातिथ्य केले. प्रसाद (दासोह) घेतला. जाताना हरळय्यांनी बसवण्णांना शरणू यावे म्हणून नमस्कार केला. बसवण्णांनी मात्र शरणूशरणार्थी शिवशरण हरळय्या म्हणून नमस्कार केला. बसवण्णा निघून गेले.

बसवण्णा निघून गेल्यावर हरळय्या विचार करतात. आपण बसवण्णांना शरणू म्हणून नमस्कार केला मात्र बसवण्णांनी शरणूशरणार्थी शिवशरण हरळय्या म्हणून नमस्कार केला. भक्तीभंडारी असणाऱ्या बसवण्णांनी केलेल्या *शरणूशरणार्थी शिवशरण हरळय्या* या अभिवादनाने गहिवरून जातात. त्याचे उपकार झाले त्यांची परतफेड करावी असा विचार करतात. कल्याणीम्माच्या सांगण्यानुसार कल्याणीम्मा डाव्या आणि हरळय्या उजव्या मांडीच्या कातड्यापासून सूंदर चप्पल बनवून बसवण्णांना भेट देतात. बसवण्णा ते चप्पल पाहून हा प्रकार ओळखतात.

बसवण्णा हरळय्याला म्हणतात, हे चप्पल पायात घालण्यासाठी नाही हरळय्या ? असे म्हणून डोक्यावर ठेवतात,प्रेमपूर्वक त्या चपला हरळय्या आणि कल्याणीम्माला आपली आठवण म्हणून परत देतात. त्या चप्पल परत घेऊन जात असताना मधूवरस वाटेत भेटतो आणि चप्पल हिरावून घेऊन पायात घालतो. त्याची अंगाची लाही लाही होते. तो दाह हरळय्याच्या कातडे धुतलेल्या पाण्याने नाहीसा होतो. त्यानंतर मधूवरस हरळय्यांची , बसवण्णांची माफी मागतात. लिंगदीक्षा घेऊन लिंगायत होतात. आपल्या मुलीचा लिलावतीचा कल्याण महोत्सव चांभार हरळय्यांच्या शिलवंत नावाच्या मुलाशी लावून देण्याचा प्रस्ताव अनुभव मंडपात ठेवतात. तो एकमताने पास होतो. त्याचा कल्याण महोत्सव लावून देतात. दोघेही लिंगायत झाल्याने त्यांची पूर्वाश्रमीची जात नाहीशी झालेली असते, त्यामुळे हा कल्याणमहोत्सव आंतरजातीय नव्हता.

पण वैदिकांनी बसवण्णांनी धर्म बुडवला म्हणून अफवा उठवतात, त्यांना शिक्षा करा म्हणून बिज्जल राजाचे कान भरतात. हलक्या कानाचा बिज्जल वैदिक लोकांच्या कपटाला बळी पडतो. बसवाला हद्दपार होण्याची, हरळय्या, मधूवरस आणि शिलवंत याना हत्तीच्या पायाला बांधून फरपटत नेऊन मारण्याची शिक्षा देतात. यानंतर वचन साहित्य जाळण्यात आणि शरणांच्या सामूहिक कत्तली करण्यात बिज्जल राजाच्या सैन्याला यश येते. त्यानंतर शरण आपल्या वेगवेगळ्या तुकड्या निर्माण करतात. गणाचारी शरणांना सोबत घेऊन या तुकड्या सांगली, कोल्हापूर लातुर नांदेड सोलापूर या भागात जातात, काही तुकड्या उलवीला जातात. उलवीला जाणाऱ्या तुकड्यांचे नेतृत्व षटस्थल चक्रवर्ती चिन्मयज्ञानी चेन्नबसवेश्वर , माता नागाई, वीरसती गंगाबिका, गणाचारी मडिवाळ माचीदेव, महाशरण कक्कय्या, किन्नरी बोमय्या करतात. सांगलीकडे जाणाऱ्या तुकडीचे नेतृत्व शरणी वरदानी दानम्मा, वीर सोमेश्वर करतात. कोल्हापूर भागात जाणाऱ्या तुकडीचे नेतृत्व शरण धुलेश्वर आणि भैरवनाथ करतात. अमुगी रायम्मा,देवय्या, सोंन्नलगी सिद्धरामेश्वर हे सोलापूर भागात जाणाऱ्या तुकडीचे नेतृत्व करतात.
शरणांच्या तुकड्यानी (गटांनी) प्राणपणाने जीवाची बाजी लावून धर्मग्रंथ वचनसाहित्य जतन करून ठेवले. सांभाळले, खरे जंगम बनून प्रसारित केले. आपल्या निजैक्य स्थळी जाऊन बसवविचारांचा प्रसार प्रचार केला.

या प्रसंगाचे तुरुगाही रामण्णा नावाचे शरण आपल्या वचनात उल्लेख करतात. कल्याणक्रांतीनंतर शरणांचे लिंगैक्य आपल्या वचनात लिहितात, स्वतःही गाईगुरांच्या मागे फिरत असताना लिंगैक्य होण्याची इच्छा करतात . ते ऐतिहासिक वचन असे-

बसवण्णा आले ‘कल्लीगे ‘ एके दिवशी
चन्नबसवण्णा उळवीमध्ये,
प्रभू, अक्का कदलीद्वारीं,
उरलेले सर्व प्रमथ आपल्या इष्टस्थळी,
मी गुरांच्या पाठीमागे जाऊन आडोशाला,
सर्वांचे दडणे ऐकुनी मी
गोपतीनाथ विश्वेश्वरलिंगामध्ये दडतो.
इतिहासाच्या पाऊलखुणा

कल्याणच्या प्रतिक्रांतीत बिज्जलाच्या सैन्याने वचन साहित्य जाळून टाकले, शरणांच्या हत्या केल्या. वीरमाता अक्कनागलंबिका, गणाचारी शरण (मडिवाल माचीदेव, कक्कय्या, चन्नबसवेश्वर), वीरांगना दानम्मा या गणाचारी शरण-शरणीच्या नेतृत्वाखाली शरणांच्या काही तुकड्या तयार झाल्या. अनुभवमंटपात निर्मिलेले समतेचे साहित्य वचन रक्षण करण्यासाठी कल्याणपासून वेगवेगळ्या दिशेला पांगले. काही शरण कल्याणच्या प्रतिक्रांतीनंतर आपल्या निजस्थानी परत गेले, तेथे जाऊन त्यांनी खऱ्या अर्थाने जंगमप्रसारकांचे कर्तव्य बजावले.

भावार्थ: तुरुगाहि रामण्णा आपल्या वचनात शरणांचे लिंगैक्य सांगतात. म. बसवण्णा हे पूर्वी कप्पडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडलसंगम क्षेत्री लिंगैक्य झाले (मडिवाळ माचय्यांच्या वचनात कप्पडी म्हणून कुडलसंगम क्षेत्राचा उल्लेख आला आहे. ) रामण्णा या वचनात कल्लीगे म्हणून उल्लेख करतात. ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध झाले की बसवण्णांच्या लिंगैक्य क्षेत्र कुडलसंगमचा उल्लेख पूर्वी कप्पडी, कल्लीगे असा होत होता. माचय्यांच्या आणि रामण्णांच्या वचनात उल्लेख आहे (कल्लीगेचा अर्थ कन्नड भाषेत दगड असा होतो). अक्कमहादेवी, अल्लमप्रभू कदलीवनात ऐक्य पावले. उरलेले सर्व शरण आपापल्या इष्ठस्थळी / निजस्थळी जाऊन जंगम प्रसारक म्हणून कार्य करत कालांतराने लिंगैक्य झाले. रामण्णा म्हणतात, मी गुरांच्या मागे फिरत असताना शरणांच्या ऐक्याच्या वार्ता ऐकल्या. शेवटी रामण्णा वचनात दुःखी होतात आणि म्हणतात, मीही गोपतीनाथ विश्वेश्वरलिंगात विलिन होतो.

क्रांती चळवळ म्हणून उदयास आलेली लिंगायत चळवळ पुढे लिंगायत एक स्वतंत्र अवैदिक धर्म झाली आहे. पुरातन काळात लिंगागी नंतर लिंगवंत नावाने ओळखला जाणारा धर्म आता लिंगायत या अधिकृत नावाने ओळखला जात आहे. भविष्यकाळात यांची ओळख बसवधर्म अशी होईल यात काडीमात्र शंका नाही. आजचा कल्याणक्रांती विजयोत्सव बसवधर्म विजयोत्सव नावानेही प्रसिध्द आहे.

“शरणूशरणार्थी” या एका शब्दासाठी शरणांचे इतके मोठे बलिदानाची आठवण म्हणून, तो इतिहास, तो वारसा जपण्यासाठी आम्ही गर्वाने आणि अभिमानाने “शरणूशरणार्थी” म्हणावे. एकमेकांना याच शब्दाने नमस्कार करावे.
सर्वाना माझा “शरणूशरणार्थी ! शरणूशरणार्थी !! शरणूशरणार्थी !!!”
लेखन व छायाचित्रे : श. अभिषेक देशमाने (९८२२०५४२९१)
वरील लेखांचे व छायाचित्रांचे सर्वाधिकार व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन आहे, लिंगायत युवा.कॉम लेखकाच्या मतांशी सहमत असेलच असे नाही.
Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
३ डिसेंबरच्या सांगली लिंगायत महामोर्च्याची तालुका बैठक उद्या पलूसमध्ये (२६ ऑक्टो)

पलूस: सांगली येथे ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामोर्चाची तालुकास्तरीय बैठक उद्या पलूस इथे आयोजित करण्यात आली आहे. पलूस येथील शिवपार्वती

Close