तोंगिन महादेवी: लवून नमस्कार करणारी शरणी महादेवी

1 min read
नासवू नका, नासवू नका जीवन, धरा हो धरा, अजि शिवाचे चरण. नश्वर पहा हो तुमचे शरीर, संसारसुख नसे पहा हो स्थिर. चेन्नमल्लिकार्जुनाद्वारा लिखित अक्षरे पुसण्यापूर्वीच शरणूशरणार्थी म्हणा त्वरे.- वीरवैराग्यनिधीं अक्कमहादेवी.

शरणी अक्कमहादेवी  आपल्या वचनात  जीवन व्यर्थ जाण्यापूर्वी भक्ती करा, आयुष्य संपण्यापुर्वी एक वेळ तरी शरणांना अभिवादन करा, एकदा तरी शरणू शरणार्थी म्हणा असें सांगते.

शरणांच्या मांदियाळीत वेगवेगळे कायक करणारे शरण वेगवेगळ्या भागातून एकत्र आले होते. आपला कायक करून उदरनिर्वाह करत असत. दासोह करत असत. शरणांमध्ये काही शरण दांम्पत्यही होते. आपल्या पतीला त्या कायकात मदत करत असत. बसवण्णा-निलंबिका-गंगाबिका, चांभार हरळय्या- कल्याणीम्मा,जेडर दासिमय्या-दुग्गळे, मोळीगे मारय्या आणि महादेवी, हडपद अप्पण्णा आणि लिंगम्मा, आय्दक्की मारय्या- लक्कम्मा, दयामूर्ती दसरय्या- वीरम्मा ही शरण दंपत्ती प्रसिद्ध आहेत.  बसवण्णांच्या अनुभवमंटपात सहभागी होणाऱ्या शरणांना नित्य कायक करणे अनिवार्य होते. वैदिक हिंदू धर्मातील जाती आणि लिंगायत धर्मातील पोटजाती यात जमीन असमानचा फरक आहे. वैदिक हिंदू धर्मातील जाती या उच्च-नीच भेद घेऊन जन्माला आल्या. पण लिंगायत धर्मातील जाती या उच्च-नीचतेेचा भेद मोडण्यासाठी लिंगायत धर्मात परावर्तीत झाल्या. म्हणुन ब्राम्हणांपासून अतिशूद्र समजल्या जाणाऱ्या सर्व जाती उच्च-नीच भेद सोडून लिंगायत धर्मात समाविष्ट झाल्या.

नमस्कार करणारा श्रेष्ठ की नमस्कार करून घेणारा श्रेष्ठ या विषयावर विचार केला तर लक्षात येईल की नमस्कार करणे ही नम्रतेची भावना  आहे.  एकमेकांना नमस्कार करताना कोणताही भेद पाहू नये, हे आपल्याला वचन साहित्य वाचल्यावर लक्षात येते. अगदी वारकरी संप्रदायात लिंगभेद किंवा वयाचा विचार न करता समोर येणाऱ्या वारकऱ्यांना माऊली म्हणून नमस्कार करतात. जैन बांधव जय जिनेंद्र ,धनगर जय मल्हार, मुस्लिम सलाम-वाले-कुं,  बौद्ध धर्मिय जय भीम किंवा नमो बुद्धाय, हिंदू बांधव रामराम किंवा नमस्कार म्हणून नमस्कार करतात, मात्र आपले बरेच लिंगायत बांधवांना आपला अभिवादनाचे शब्दसुद्धा माहीत नाही, हेच लिंगायतांचे दुर्दैव आहे.आजही लिंगायत बांधव एकमेकांना भेटल्यावर  ‘शरणु’,’ शरणूशरणार्थी’ हे अभिवादनाचे आणि निरोप देताना ‘शरणू यावे.’ हे शब्द वापरताना अत्यल्प प्रमाणात दिसत आहे. शरणांनी आपल्या वचनातून एकमेकांना नमस्कार केला आहे. आपण आपली नमस्काराची संस्कृती विसरत आहोत याचा खेद वाटत आहे. नमस्कार करणे हाही एक कायक होऊ शकतो हे दाखवून देणारी एक शरणी तोंगिन महादेवी.

तोंगिन या कन्नड शब्दाचा अर्थ लवून नमस्कार करणे असा आहे.  कल्याणमध्ये राहणारी एक गरीब शरणी तीच नाव महादेवी. महादेवी  सूर्योदयापूर्वी उठून स्नान , लिंगपुजा करून  शेजारच्या घरी जाऊन त्यांना झोपेतून जागे करत आणि लवून ‘शरनु’, ‘शरनु’ म्हणून नमस्कार करून पुढे जात असे. सकाळी लवकर झोपेतून जागे करून नमस्कार करणे हाच तिचा कायक होता.

महादेवी कल्याणच्या अनुभवमंटपाची एक सदस्या शरणी होती.  प्रत्येक शरणांनी  शरीर श्रमवून कायक करावे, त्यातून उदरनिर्वाह करावा असा अनुभवमंटपाचा नियम होता.

महादेवीचे काम कल्याणमध्ये सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. तिची कीर्ती सर्वदूर पसरली. तिने आपले काम अविरत चालू ठेवले. नावाजलेली शरणी होऊन तिने आपल्या जीवनाचे सार्थक केले. शेवटी ती लिंगैक्य झाली. कामातच कायक अनुभवलेली शरणी म्हणजे तोंगिन महादेवी.


© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.
Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
प्रत्यक्ष शिवालाच आपला पुत्र मानणारी बिज्जमहादेवी

बोलावे तसे चालावे हा शरणांचा नियम होता. परधन, परस्त्री, परान्न याची अभिलाषा करू नये.  स्वतः श्रम करून  शिवकृपेने मिळालेला प्रसाद

Close