क्रांतिवीरांगना वैराग्ययोगिनी अक्कमहादेवी

1 min read

कर्नाटक राज्यातील शिमोगा  जिल्ह्यातील शिराळकोप्प तालुक्यातील उडुतडी म्हणजे अक्कमहादेवीचे जन्मगाव.  शेठ निर्मलशेट्टी आणि सुमतीदेवी  या सदाचारसंपन्न शिवभक्त दाम्पत्यांच्या पोटी अक्कमहादेवीचा जन्म झाला.  महादेवी अस तिचे नाव ठेवले.   महादेवी बालवयापासून तारुण्यावस्थेपर्यत महादेवी शिवपूजन करणे, फुलांच्या माळा करणे, विभूती लावणे, लिंग रुद्राक्ष धारण करणे, वाचन करणे , समाजाचे निरीक्षण करणे, त्यांच्या प्रश्नावर विचार करणे , वचने श्रवण करणे हीच तिची दिनक्रम होता. बसवादी शरणांच्या वचनाने प्रभावित होऊन अक्का स्वतः वचने लिहू लागली.

शरणांचा लिंगपती शरणसती हा लिंगायत सिद्धांत अक्काने आपल्या जगण्यात पुरेपूर उतरविला होता. तिने बालपणीच मल्लिकार्जुनाला आपला पती म्हणून वरले होते. ती नित्य मल्लिकार्जुनाचे  ध्यान करणे, अक्कांना   मल्लिकार्जुनाच्या भेटीची ओढ लागलेली असे.  अक्कमहादेवीची वचने ही अध्यात्माच्या उच्च अध्यात्म पातळीला घेऊन  जाणारी आहेत. अक्कमहादेवीची वचने जीवन व्यापी, प्रभावी आहेत.

एकदा राजा कौशिक राज्यात फेरफटका मारण्यासाठी गेला असताना त्याला अक्कमहादेवीचे दर्शन झाले, पहाताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला.  त्याने अक्कांना लग्नासाठी मागणी घातली .  अक्कमहादेवीना लग्न करायचे नव्हते.  आईवडिलांच्या आग्रहाखातर तिने लग्न केले पण त्यासाठी दोन अटी घातल्या, ” मी शिवपूजेत असताना राजाने मला स्पर्श करू नये. माझ्या इच्छेविरुद्ध मला स्पर्श करू नये.”  या दोन अटी राजाने मान्य केल्यानंतर त्यांचे लग्न झाले.

एकदा अक्का इष्टलिंगयोगात मग्न असताना कौशिक राजाने कामांध होऊन स्पर्श केला. अटीच उल्लंघन झाले.  अक्कांनी त्या क्षणी अंगावरील वस्त्रांचा आणि राजवैभवाचा त्याग केला. ती रानावनातून भटकत कल्याणकडे निघाली.

पावसात घर करून राहता वादळाला भिऊन चालेल का ? बाजारात घर करून राहता गोंगाटाला भिऊन चालेल का ? जंगलात घर करून राहता हिंस्त्र पशूंना भिऊन चालेल का ? असे प्रश्न अक्का विचारू लागली. जंगलातून भटकत असताना अक्कांना  अनेकवेळा अनेक संकटांना सामोरे जावे लागले.  लोकांनी अक्काना नावे ठेवली. अशापरिस्थितीतही अक्का स्थितप्रज्ञ राहिली.  अखेर कल्याणच्या अनुभवमंटपात सामील झाली.  शरण जीवनाशी एकरूपता पावली.  अक्का कल्याणच्या अनुभवमंटपात आल्यानंतर अक्का आणि अल्लमप्रभु यांच्यातील संवाद अक्कांच्या ज्ञानाच दर्शन घडवतो. अनुभवमंटपातील  शरणांनी अक्काला आपली लाडकी लेक म्हंटले आहे. अनेक वचनात अक्कांची स्तुती, गौरव केला आहे. म.  बसवण्णांनी आपल्या वचनात “अक्कमहादेवी माझी आई आहे .” अस म्हणून अक्कांचा गौरव केला आहे. अक्कमहादेवी म्हणजे अध्यात्माच्या उच्च शिखरावर पोहचलेली शरणी  होती.

कल्याणक्रांतीनंतर सर्व शरण आपल्या निजस्थळी गेल्याचा उल्लेख तुरुंगाहि रामण्णा आपल्या वचनात करतात. त्या वचनात  अक्कमहादेवी आणि अल्लमप्रभु श्रीशैलजवळच्या कर्दळीबनात जाऊन लिंगैक्य झाले.

यामुळेच अक्काला जगन्माता, शिवयोगीणी अक्कन बळग, या नावाने प्रसिध्द झाली. स्त्रीला कनिष्ठ , शूद्र ठरवून तिच्याकडून ठरवून दुययम वागणूक दिली जात होती. त्यावर अक्कमहादेवी आपल्या वचनात प्रकाश टाकते.

वचन:

फुंकिन मी रणशिंग, स्त्री न च अबला अन न हीन,

हिनवू नका स्त्रीला समजून हीन, बंधुनो लक्षात ठेवा.मीही पुरुषासम घालीन कासोटा धैर्याचा,

धारण करीन कवच स्वाभिमानाचा,

लावीन तिलक शिवप्रेमाचा,

हात सरसावून फुंकिन मी रणशिंग,

मनोधैर्याच्या  निऱ्या सुटल्या तर शपथ तुमची

हे चेन्नमल्लिकार्जुना.

विकाराचे चामडे, मलमूत्राचे मडके

हाडाचा सापळा, भ्रमाचा भोपळा

आगीत जळणारा, घाणीत कुजणारा

हा देह सोडून चेन्नमल्लिकार्जुनाला जण मानवा.

 भूक लागली तर गावात भिक्षा मागीन

तहान लागली तर नदी-तलाव आहेत

थंडीपासून रक्षिणारे पिसाट वारे आहेत

झोपण्यासाठी पडकी देवालये आहेत.

हसणे- खेळणे, सांगणे-ऐकणे, चालणे-बोलणे

शरणांच्या सहवासात आनंदाला उधान येते.

चेन्नमल्लिकार्जुना,

तू दिलेले आयुष्य असे तो,

लिंगसुखीच्या सहवासात दिवस घालवते.

माझी भक्ती  बसवण्णांची कृपा,

माझे ज्ञान प्रभुदेवांची कृपा,

माझी परिपूर्णता चेन्नबसवण्णांची कृपा

या तिघांनी एक-एक दिल्याने तीन भाव झाले,

ते तीन भाव तुम्हास समर्पण केल्याने

मला कसला त्रास उरला नाही.

चेन्नमल्लिकार्जुन देवाच्या स्मरणाने

तुमच्या करुणेचा शिशु झाला पहा

संगनबसवण्णा.

कामाला जिंकले बसवा तुमच्या दयेने.

सोमधराला धरले बसवा तुमच्या दयेने.

दिसण्यास स्त्री असले तर काय झाले ?

बलपुरुष मी बनले बसवा तुमच्या दयेने,

अतिकामी चेन्नमल्लिकार्जुनाला बाहुबंधात बांधले.

आमचे मिलन झाले बसवा तुमच्या कृपेने.

चंदनाचे तुकडे तुकडे करून उगाळले तर

ते दुखावून थरथरते का ?

सुवर्ण कापून आगीत भाजले तरी

ते दुखावून काळे कधी होईल का ?

उसाचे लहान लहान तुकडे करून 

पाण्यात पिळले, उकळून उकळून रसाची साखर झाली

 तरी दुखावून गोडी सोडेल का ?

माझी पूर्वजन्मीची पातके तुम्ही नष्ट 

केली नाही तर तुम्हालाच हानी.

माझा पिता चेन्नमल्लिकार्जुनाने कष्ट दिले 

तरीही मी शरणागती सोडणार नाही. 


© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.
Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
अक्का नागम्मा

आई मादलांबिका व वडील मादरस यांच्या पोटी जन्मास आलेली कर्त्तत्ववान मुलगी म्हणजे नागलंबिका. पुढे शिवदेव यांच्या सोबत विवाह झाला.त्यांच्या मुलाचे

Close