क्रांतिकारी लिंगायत नारिशक्तीच्या प्रेरणादायी इतिहासाचा जागर आणि नवरात्रौत्सव

1 min read
म. बसवण्णांच्या नेतृत्वाखालील शरण – शरणींच्या समग्र क्रांतीने बाराव्या शतकात स्त्री – पुरुष समानता व नारी सन्मानासाठी जाति-कुल-वर्ण-वर्ग-वंश-लिंगभेदरहित वैश्विक मानवतावादाची तुतारी फुंकली. तसूभरही तर-तम भेदभाव न करता, महिलांना पुरुषांसारखेच आणि पुरुषांइतकेच सर्व मानवी अधिकार व धार्मिक संस्कारप्राप्तीचे हक्क प्रदान केले. लिंगदीक्षेद्वारे विटाळादी पंचसुतकांच्या पातकांतून आणि अपवित्रतेच्या नरकातून लिंगवंत स्त्रीची मुक्तता केली. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही सत्य शुद्ध कायक (उद्योग, व्यवसाय, पेशा, वृत्ती ) निवडून, अर्थार्जनाद्वारे स्वावलंबी होण्याचे स्वातंत्र्य व हक्क बहाल केले. बालविवाह, जरठविवाह, सक्तीचा विवाह, देवतांशी विवाह (देवदासी प्रथा), वेश्यावृत्ती, शिक्षणबंदी, संचारबंदी, सतीप्रथा इ. रूढी -परंपरांद्वारे पुरुषसत्ताक व्यवस्थेने नारीवर्गाला जखडून ठेवण्यासाठी निर्मिलेल्या कचकड्या तोडून टाकल्या. व्यभिचारमुक्त, नीतियुक्त, दिव्य, निरामय दाम्पत्यजीवनाचा पुरस्कार केला. अध्यात्मजीवी स्त्रियांना हवे तर विवाहित न होता, विरक्त जीवन जगण्याचेही स्वातंत्र्य देण्यात आले. ह्या अभूतपूर्व मुक्त वातावरणामुळेच समाजाच्या सर्व स्तरातील महिला शरण आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. मुक्तीचे पंख लाभल्याने, केवळ आध्यात्मिक सिद्धीच नव्हे, तर साहित्यनिर्मिती, संस्कृतिरक्षण, क्षात्रतेजदर्शन, तत्त्वचिंतन, राजप्रशासन इ. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तबगारीने आणि पराक्रमाने शरणींनी, लिंगवंत महिलांनी प्रेरणादायी इतिहास घडविला आहे.

बसवभगिनी अक्कनागम्मा, बसवपत्नी गंगांबिका – नीलांबिका, वीरविरागिणी अक्कमहादेवी, दानदासोही दानम्मा, मोळिगे महादेवी, आय्दक्की लक्कम्मा, सत्यव्रती सत्यक्का, शरणी अमुगे रायम्मा, अक्कम्मा, शिवप्रिया, पद्मावती, कित्तूर राणी चन्नम्मा, बेलवडी मल्लम्मा, केळदी चन्नम्मा अशा कितीतरी इतिहासप्रसिद्ध लिंगायत स्त्री-रत्नांनी आपल्या दीप्तिमान कर्तबगारीने आमचा इतिहास समृद्ध केला आहे.

अशा ह्या क्रांतिकारी लिंगायत नारिशक्तीच्या प्रेरणादायी इतिहासाचे विस्मरण घडू नये, प्रत्येक पिढीत इतिहासाचा हा उज्ज्वल वारसा जतन व्हावा, म्हणून प्रतिवर्षी ह्या ना त्या निमित्ताने, विशेषतः उत्सवांच्या निमित्ताने त्या झगमगणा-या इतिहासाचा जागर कसा घडेल, ह्या संदर्भात सर्व लिंगायतांनी, विशेषतः लिंगवंत महिलांनी चिंतन करणे गरजेचे आहे असे वाटते. कारण….
उत्सवात सहभागी होऊन सामाजिक सहजीवनाचा आनंद उपभोगणे ही सहज मानवी प्रवृत्ती आहे आणि असा सामाजिक सहजीवनाचा आनंद विविध सात्त्विक उत्सवांत सहभागी होऊन मिळविण्यात गैर काही नाही. अशा उत्सवांच्या माध्यमातून विधायक सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, धार्मिक प्रबोधन कार्य पडायला हवे. याखेरीज, गायन, नर्तन, संगीत,विविध  क्रीडा, रंगावली इ. कलागुणांना प्रोत्साहन नि उत्तेजन मिळायला हवे. दिवसातील चौदा – पंधरा तास रोजच्या घरकामात कंबर मोडून घेणाऱ्या गृहिणींना तर अशा उत्सवी विरंगुळ्याची, थोड्याशा बदलाची नितांत गरज असते. उत्सवांमुळे दररोजच्या नित्याच्या धावपळीच्या  दबडग्यातून थोडी उसंत मिळते, थोडा मोकळा श्वास घेता येतो, मनावरचे ताणतणाव शिथिल होतात, मानसिक विसावा मिळतो , थोडेफार मनोरंजनही घडतेच! शिवाय, आपले विविध छंद, कौशल्ये समाजापुढे अभिव्यक्त करण्याच्या , प्रदर्शित करण्याच्या संधी उपलब्ध होतात. संगीताच्या माध्यमातून परमानंदाचा लाभ घेता येतो. अशा विविध कारणांमुळे, उत्सवांतील महिलांचा ओढा, उत्साह, सहभाग नेहमीच द्विगुणित होत चाललेला दिसतो. ह्या सहज प्रवृत्तींचा उपयोग लिंगायत नारी शक्तीच्या प्रेरणादायी इतिहासाचा जागर घडविण्यासाठी करून घेता आला तर?

येत्या दि. २१ ते २९ सप्टेंबर २०१७ ह्या अवधीत विविध शक्तिदेवतांची आराधना, कठोर उपवास, जागर, देवीला पशुबळी इ. धार्मिक प्रथांखेरीज टिपरी, गरबा नृत्य, घागर घुमविणे, झिम्मा – फुगडी इ. महिलांचे खेळ, स्पर्धा, तसेच भजन, कीर्तन, गीतगायन, नृत्य इ. सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले जातात. दीप रोषणाई, पुष्प सजावट, शोभेचे दारुकाम असे नेत्रदीपक उपक्रम आयोजित केले जातात. अशा प्रकारे अनेकविध इष्ट – अनिष्ट प्रथा – परंपरांद्वारे पौराणिक देवीदेवतांच्या नावाने नवरात्र उत्सव साजरा करण्याची रूढी – परंपरा बहुसंख्याक समाजात चालत आलेली आहे. आपल्या अल्पसंख्याक लिंगायत समाजातील महिलांसुद्धा ह्या लिंगायत संस्कृतिबाह्य उत्सवात अज्ञानाने, अथवा अन्य अनुकूल योग्य पर्याय उपलब्ध नसल्याने, उत्सवी आनंदाच्या ओढीने सहभागी होत असतातच.

अशा परिस्थितीत, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, नवरात्रौत्सवास शरण संस्कृतीस पूरक असे नवस्वरूप प्राप्त करून देऊन, क्रांतिकारी लिंगायत नारी शक्तीच्या प्रेरणादायी इतिहासाचा जागर घडविला तर, शरण साहित्य व संस्कृतीचे रक्षण व संवर्धन तर घडेलच, याशिवाय सर्व लिंगायत आबालवृद्ध स्त्री – पुरुषांना सुज्ञानाच्या प्रबोधनाबरोबरच उत्सवी आनंदही लुटता येईल असे वाटते. लिंगायत नारिशक्तीच्या प्रेरणादायी इतिहासाचा जागर घडविणाऱ्या लिंगायत नवरात्रौत्सवाचे स्वरूप कसे असावे असे तुम्हाला वाटते?

लेखक: शिवानंद
©शिवानंद, २०१७

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.
 

 


Print Friendly, PDF & Email
Read previous post:
श्राद्ध, पितर, कर्मकांड करू नये

सप्तक्रांतीचे जनक, लोकशाहीचे पुरस्कर्ते, महात्मा  बसवण्णांचे क्रांतिकारी वचन दूध, तूप मूर्तीवर टाकून नुकसान करण्यापेक्षा तुम्ही खा. नाही तर गाई- म्हैशीच्या

Close