श्राद्ध, पितर, कर्मकांड करू नये

1 min read
सप्तक्रांतीचे जनक, लोकशाहीचे पुरस्कर्ते, महात्मा  बसवण्णांचे क्रांतिकारी वचन
दूध, तूप मूर्तीवर टाकून नुकसान करण्यापेक्षा तुम्ही खा.
नाही तर गाई- म्हैशीच्या वासरांना द्या, कारण तो त्यांचा अधिकार आहे.
चकोराला चंद्राच्या प्रकाशाच्या चिंता, कमळाला सूर्याच्या उदयाची चिंता.
भ्रमराला  पुष्पमधु शोधण्याची चिंता, आमच्या कुडलसंगमदेवाला स्मरण्याची चिंता.
भावार्थ:  पूजापाठाच्या नावाने खाद्यपदार्थांची केली जाणारी नासाडी शरणांना मान्य नाही. दूध, तूप या खाण्याच्या अमूल्य गोष्टी दगडी मूर्तीवर टाकून नासाडी करू नका, त्याऐवजी तुम्ही खा. गाई, म्हैशी   यांच्या वासरांना प्यायला द्या. चकोर पक्षाला चंद्राच्या प्रकाशाची चिंता वाटते. सूर्यप्रकाश आल्याशिवाय कमळ उमलत नाही.  मधमाशीला मधुर फुल शोधण्याची चिंता असते, मला मात्र आमच्या कुडलसंगमदेवाचे स्मरण करण्याची चिंता आहे.

दगडाच्या नागाला अभिषेक करा म्हणतात,
जिवंत नागाला दिसताच क्षणी मारा असे म्हणतात,
जंगम दारात आल्यास ‘पुढे जा’ म्हणतात,
अन न खाणाऱ्या लिंगाला खा, खा म्हणती.
आमच्या कुडलसंगमदेवाच्या शरणांची उपेक्षा केल्यास दगडाखाली दबलेल्या ढेकळासारखी  अवस्था होईल.
भावार्थ: म. बसवण्णा आपल्या वचनात  ढोंगी भक्तांवर टीका करतात.  दगडी नागाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक करतात, न पिणाऱ्या नागाला  दूध पाजतात मात्र जिवंत नाग पाहिल्यास क्षणाचा विलंब न करता मारून टाकतात. दारात जंगम आला तर त्याला भिक्षा न देता पुढे जा म्हणून हाकलतात. न खाणाऱ्या लिंगाला नैवेद्य दाखवतात.  आमच्या शरणांची उपेक्षा केल्यास  दगडाखाली अडकलेल्या ढेकळाला जसा दगडाखालून हलता येत नाही अशी अवस्था होईल.

नवस करणे म्हणजे दंड भरण्यासारखे आहे,
गर्दी गोळा करून केलेली भक्ती अवडंबर आहे,
नवस करू नका, अवडंबर करू नका, आलेल्या कुडलसंगमदेवाच्या शरणांचा आदर करावा.
भावार्थ:  नवस करणे म्हणजे चुकीबद्दल दंड भरल्यासारखे आहे, लोक गोळा करून जादूगाराप्रमाणे खेळ करून भक्तीचे प्रदर्शन , अवडंबर करण्यासारखे  आहे. म्हणून नवस करू नका, भक्तीचे अवडंबर करू नका. शरणांचा आदर करा.

अग्नीला देव मानून त्यामध्ये आहुती देणाऱ्या ब्राम्हणाच्या घराला आग लागली असता, मोरीचे पाणी  टाकतात, रस्तावरची धूळ टाकतात, आरडाओरडा करतात , अग्नीची स्तुती करायची सोडून निंदा करतात, कुडलसंगमदेवा.
भावार्थ:  कर्मकांड करणाऱ्या , होम-हवन करणाऱ्या ब्राम्हणांचा ढोंगीपणा उघड करताना बसवण्णा म्हणतात, हे ब्राम्हण पुरोहित यजमानांच्या घरी जाऊन होम हवन करतात, अग्नी देव आहे म्हणून सांगतात. त्या अग्नीला तृप्त करण्यासाठी अग्नीत तूप, तांदूळ, तीळ इ. धान्य होमात यज्ञात टाकून जाळून वाया घालवतात.  त्या अग्नीची तोंड भरून स्तुती करतात मात्र तोच अग्नी त्यांच्या घराला लागला की मात्र मोरीचे, गटारीचे पाणी आणि रस्त्यावरची धूळ माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करतात.आरडाओरड करून मदतीसाठी लोकांना गोळा करतात.  अग्नीची स्तुती करायची सोडून निंदानालस्ती करतात. अग्नीला शिव्या देतात, नावे ठेवतात.

अश्वमेध असो, गायत्री  मंत्र जप असो, मोहन यंत्रही तेच असो, कुडलसंगमदेवाच्या शरणांची वाणीच याहूनी श्रेष्ठ पहा.
भावार्थ:  अश्वमेध, गायत्रीमंत्रजाप, महामृत्युंजय जाप वेगवेगळे यंत्र तयार करून पूजा, पाठ ,पारायण करण्यापेक्षा  शरणांचा अनुभाव श्रवण करावा.

मणिमाळा घालून, अनेक ठिकाणी भस्म लावून,
तपत्रयाविना  पूजा करा, तापत्रय लिंगाला पसंत नाही,
केवळ अभिषेक  केल्याने कुडलसंगमदेव प्रसन्न होईल का ?
भावार्थ:  गळ्यात ढीगभर रुद्राक्षमाळा, स्फटिकाच्यामाळा, वेगवेगळ्या रत्नांच्या माळा घालून अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी  भस्म लावून  काया, वाचा , मन यांना त्रास देऊन पूजा करू नका. अशाप्रकारे केलेली लिंगाला आवडत नाही. केवळ अभिषेक केल्याने देव प्रसन्न होत नाही.

पाहून पाहून केले जाणारे व्रत योग्य नाही,
मनाच्या आणि देहाच्या तृप्तीसाठी केली जाणारी व्रत योग्य नाही.
ज्ञानाची उपेक्षा करून काल्पनिक व्रत करणे योग्य नाही.
भावार्थ: दुसरे करतात म्हणून आपण व्रत करू नये.  मनाला किंवा शरीराला सुख मिळावे म्हणून व्रत केल्यास त्या व्रताला व्रत म्हणता येत नाही. ते व्रत नाही. ज्ञानप्राप्त करायचे सोडून काल्पनिक पोथी पुराणे यातील व्रत करणे चुकीचे आहे.

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.
 


Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
गौरी लंकेश यांच्या हत्येचा कडेगावमध्ये निषेध

कडेगाव: बसव ब्रिगेडच्या कडेगाव तालुका व शहर शाखेतर्फे गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली व तहसीलदार

Close