गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निमित्ताने …

1 min read

 

गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर च्या सायंकाळी त्यांच्या राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.दाभोलकर,पानसरे,कलबुर्गी आणि आत्ता गौरी लंकेश ह्या पुरोगामी वर्तुळातील विविध लोक चळवळीशी संबंधित असणाऱ्या,प्रबोधनाचे कार्य अविरत चालविणाऱ्या व्यक्तीची हत्या ज्याप्रकारे झाली व त्यानंतर एका विशिष्ट विचारधारा मानणाऱ्या लोकांकडून त्याबद्दल जो आनंद व्यक्त झाला,दूषप्रचार सुरू झाला त्यावरून अज्ञात हल्लेखोर म्हणणे हे फारच सौजन्याचे होईल.

गौरी लंकेश ह्या कोण होत्या.? त्या एका विद्यापीठाच्या कुलगुरू राहिल्या.एक मुलांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या वार्षिक वगैरे गाइड चं प्रकाशन आदी करून आपला चरितार्थ चालवायच्या. गौरी लंकेश पत्रिके हे नियतकालिक ५० जणांच्या सहभागातून आणि कुठल्याही प्रकारच्या जाहिरातीशिवाय चालविल जात होतं.

कर्नाटकात जात, वर्ग आणि धार्मिक शोषणाच्या विविध चळवळींना समान किमान कार्यक्रमाच्या आधाराने एकत्र आणन्याच्या कामी त्या अग्रेसर होत्या.जातीविरोधी चळवळीत असलेल्या नाटककार, कवी, पत्रकार पी. लंकेश यांच्या त्या कन्या. मागील वर्षभरात जेएनयु आंदोलन, उना आंदोलन यांच्या समर्थनात त्या राहिल्या. कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी यासारख्या तरुण नेतृत्वाशी त्यांचा सतत संवाद होता. मी ही मागच्या ३-४ वर्षात त्यांना दोनदा भेटलो होतो. पहिली भेट व त्यानंतरचीही भेट ही कर्नाटक कोमु सौहार्द वेदिकेच्या अधिवेशनात. कर्नाटक कोमु सौहार्द वेदिके म्हणजे कर्नाटक सांप्रदायिक सद्भावना मंच कर्नाटकातल्या २०० समविचारी संघटनानी मिळून सांप्रदायिक सद्भाव आणि कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष, समंजस सामाजिक वातावरण हे कायम राखणे आणि त्यास वृद्धिंगत करण्याकरिता उभारलेली चळवळ. या मंचात फुले आंबेडकरी संघटना,कम्युनिस्ट विचाराच्या संघटना, लिंगायत पंथीय मठप्रमुख, सुफी आणि लिंगायत यांच्या विचारप्रवाहास अनुसारणारे पंथ सहभागी आहेत.गौरी लंकेश ह्या या मंचाच्या एक संस्थापक सदस्य होत्या.

कर्नाटक राज्यात बसवेश्वर यांच्या समतावादी विचारांची परंपरा आहे.राज्यात जिथे लिंगायत मठ आहेत त्याच्या बाजूला सुफी पिरांचे दर्गेही आहेत. काही ठिकाणी मंदिर आणि मस्जिद असे संयुक्त structure आहे.मी दोन वर्षाआधी कर्नाटक कोमु सौहार्द वेदिकेच्या अधिवेशनास रायचूर जवळील तीनथिनी ब्रिज ला गेलेलो होतो .तिथे मोईनेश्वराचे  पुजास्थळ आहे . खालील वास्तू मंदिर तर वर मस्जिडीचे घुमत आहे.पूजेसाठी हिंदू आणि मुस्लिम असे पुजारी आहेत.अशा प्रकारच्या वास्तू अन्यही ठिकाणी आहेत.

१९९२ साली बाबरी मस्जिद पाडण्यात आली. त्यानंतर कर्नाटक राज्यात आत्ताचे भाजपा प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद जोशी च्या नेतृत्वाखाली अशा प्रकारच्या ज्या वास्तू आहेत त्या मुस्लिम प्रभावातून मुक्त करण्यात येऊन त्यांना हिंदू वास्तूशास्त्राप्रमाणे बांधली जावी असे अभियान सुरू झाले. त्याविरुद्ध कर्नाटकातली जी समतावादी, मिलिजुली संस्कृती आहे त्याचे जतन करण्याची मोहीम या मंचाने आपल्या स्थापनेपासून सुरू केली.या मोहिमेत बसवांना प्रमाण माननारे मठ जे आपल्या जातिभेदविरोधी, स्त्री-पुरुष समतेची  भूमिका घेऊन सामील झाले. चिकमंगलुर जवळील बाबाउद्यानगिरी मठ जो लिंगायत-सुफी मिलीजुली संस्कृतीचे प्रतीक आहे त्यास संघाच्या कारस्थानापासून वाचविण्याची लढाई मंच लढतो आहे. देशज अशा समतावादी परंपरा घेऊन हिंदुत्वाच्या एकसाचीकरनाच्या विरोधात लढणारे लोक संघाकरिता जास्त घातक आहेत. महात्मा गांधी हिंदू धर्माची सहिष्णु व्याख्या जी परधर्म द्वेषावर आधारित नव्हती स्वतःस सनातनी हिंदू म्हणवून घेत करीत होते.ती व्याख्या सावरकरांच्या पितृभू पुण्यभू च्या विरोधातील होती. कलबुर्गी मुख्यतः बसवेश्वर प्रणित लिंगायत धर्माची व्याख्या करीत होते जी लिंगायत धर्माचे वीरशैवीकरण करण्यास निघालेल्या प्रतिगाम्यांनाही आवडणारी नव्हती.

संघाच्या एकसाची हिंदुत्वाविरोधात लढायचे तर या देशातील देशज जातीविरोधी अशा लिंगायत,महानुभाव,बौद्ध,नाथ,जैन,बौद्ध,शीख,सुफी आदी परंपरांना घेऊन लढावे लागेल.या परंपरा मानणाऱ्या लोकांमध्ये मैत्रीपूर्ण संवाद वाढीस लागेल अशा कार्यक्रमाची आखणी करावी लागेल. कर्नाटकातल्या ‘ककोसौवे’ नी अशा प्रकारच्या प्रयोगास सुरुवात केली होती.

महाराष्ट्रातही वारकरी संप्रदायाने डाउ या कंपनीस हद्दपार केल्यानंतर वारकरी, महानुभाव, लिंगायत, बौद्ध, सुफी, नाथ आदी पंथामध्ये चर्चा होऊन ४-५ वर्षांपूर्वी साम्राज्यवाद व ब्राह्मणवादविरोध भूमिका घेत सर्वधर्मिय सर्वपंथीय सामाजिक परिषद चे बीजारोपण केले.कर्नाटकच्या ‘ककोसौवे’ च्या समर्थनात असलेल्या बसवलिंग पट्टदेवरू भालकी मठ यांचाही बंडातात्या कराडकर आणि महानुभाव महंत न्यायांबास बाबा यांच्या सोबतीनी ही परिषद उभारण्यात सहभाग राहिला. त्याच्या आजपर्यंत १० च्या आसपास परिषदा झाल्या असल्या तरी म्हणावे तसे संघटीत स्वरूप प्राप्त झालेले नाही.

संघपरिवार वेगाने मूळात वैदिक विरोधी समतावादी असलेल्या परंपराना हिंदुत्ववादी एकसाची फोल्ड मध्ये आणत त्यांना मुस्लिमविरोधी करण्याचा प्रयत्न करीत आहे. उत्तरप्रदेशातील नाथ पंथीय मठाचे उदाहरण याकामी पुरेसे आहे. हिंदुत्वाच्या फोल्ड मध्ये गेलेल्या नाथपंथीय मठाचे प्रमुख योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत. परंतु दुसरीकडे लिंगायत हा वेगळा धर्म आहे व त्यास तशी मान्यता द्या असे म्हणत लिंगायत लाखोंच्या संख्येने मोर्चे काढीत आहेत. त्यांनी आरएसएस च्या सरसंघचालक मोहन भागवत यांना तुम्ही आमच्यात लूडबुड करू नका असे सुनावले आहे. ह्या गोष्टी समजून घेण्याचीही गरज आहे.

विविध तंत्राचा आधार घेत,खोट्या बातम्या पसरवत आजूबाजूच्या लोकांच्या मेंदूचा ताबा उजव्या शक्तीद्वारा घेतला जात आहे. यातीलच एखादा कुणी वा प्रसंगी झुंड ही हिंसेच्या आधाराने माणसे संपवित आहे.अशा वेळी देशज परंपरा मध्ये संवाद घडविणे, विविध ठिकाणी होत असलेले प्रयोग समजून घेत आपले कार्यक्रम आखणे, बदललेल्या स्थितीचे नव्याने आकलन करून घेणे यातूनच पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.

एक मारला की ते दुसरा मारताहेत, दुसरा मारला की तिसरा. त्यांनी अशा प्रकारे युद्ध सुरू केले आहे असे म्हटले पाहिजे. आमच्या मागण्या,नारे,घोषणा आणि कृतीकार्यक्रम आरोपींना अटक करा, माणूस मारला म्हणजे विचार संपत नाहीत, आम्ही सारे….,निषेध सभा, धरणे आंदोलन या पलीकडे जात नाहीत तोपर्यंत हे सत्र थांबणारे नाही. खुनीच जेंव्हा सत्तेवर आहेत तेंव्हा ते न्याय देतील ही भाबडी आशा आहे. खुनानंतर फक्त प्रतिक्रिया देत राहणे यातून बाहेर पडून संघाचा जो अजेंडा आहे त्याविरोधातील सांस्कृतिक राजकारण हे जनतेच्या भौतिक प्रश्नाच्या जोडीने केले उभे केले पाहिजे. गौरी लंकेश अशा प्रकारच्या समूहाचा भाग होत्या त्यांना अभिवादन करून आपण आपली लढाई पुढे नेली पाहिजे.

© दयानंद कनकदंडे , २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.

फोटो सौजन्य: indianexpress.comPrint Friendly, PDF & Email
दयानंद कनकदंडे

दयानंद कनकदंडे

मुक्त पत्रकार आणि युवा भारत या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक. २००५ पासून चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कार्यरत. हिंदी आणि मराठी नियतकालिके यात लेखन आणि अनुवाद. सध्या वास्तव्य पुणे.
दयानंद कनकदंडे

Latest posts by दयानंद कनकदंडे (see all)

दयानंद कनकदंडे

मुक्त पत्रकार आणि युवा भारत या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक. २००५ पासून चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कार्यरत. हिंदी आणि मराठी नियतकालिके यात लेखन आणि अनुवाद. सध्या वास्तव्य पुणे.

Read previous post:
आम्ही बसवन्नांचे शरण…!!!

शरणांचा शरण होईन, शरणांचा दास होईन असे विश्वगुरु बसवण्णांनी वचनातून सांगितले. मग आज लिंगायत धर्ममान्यता आंदोलनात सक्रिय लिंगायतानी भक्त किंवा

Close