लातूरच्या लिंगायत महामोर्च्याच्या निमित्ताने

1 min read
लिंगायत हा स्वतंत्र अवैदिक धर्म आहे, हे मी बऱ्याच लेखातून पुराव्यासह लिहिले आहे.आमचे मार्गदर्शक प्रा. आनंद कर्णे सर यांनी आपल्या लिंगायत बोलीतून वीरशैव धर्म वेगळा आहे, तो वैदिक आहे, लिंगायत स्वतंत्र धर्म आहे  या विषयावर खंडन मंडन करणारा लेख लिहिला होता.  काही दिवसांपासून लिंगायत धर्म जागृती होत आहे. बिदर बेळगाव  या ठिकाणी लिंगायत धर्म मोर्चा यशस्वीरित्या पार पडला. लातूर येथे ३ सप्टेंबर २०१७ रोजी होणाऱ्या यशस्वी मोर्चाची भीती वाटून शिवाचार्यांनी वीरशैव लिंगायत धर्म अधिवेशन नावाचे कधीही यशस्वी न होणारे अधिवेशन, टुकार आणि भाडेकरू वीरशैव लोकांना तसेच शिवाचार्यांना गोळा करून वीरशैव आणि लिंगायत एकच आहेत असा बनाव करायला चालू केले आहे.  लिंगायत नावाच्या वादळाला घाबरून वैदिकांचा टेंबा मिरविणाऱ्या पंचाचार्य जगद्गुरूना आपले सिंहासन आणि मठ सोडून मोर्चासाठी यावे लागले आहे, हेच आपल्या लिंगायत धर्म अल्पसंख्याक मान्यतेच्या मोर्चाचे यश आहे.  आपण लावलेले सुरुंगानी पंचपीठाच्या जगद्गुरूना  हलवून टाकले आहे. भविष्यात आपली दुकाने बंद होतील या भीतीने जाती जंगमसुद्धा शिवाचार्य आणि पंचाचार्यांच्या बरोबरीने  पोकळ मोर्चे काढत आहेत. आता महाराष्ट्रात यांची डाळ शिजणार नाही म्हणुन कर्नाटकात मोर्चे काढत आहेत, ज्या मोर्चाला पंचाचार्य, शिवाचार्य आणि लिंगायतांच्या तुकड्यावर जगणारे जाती जंगम आहेत.  या प्रतिमोर्चाला भीक घालण्याची लिंगायताना मुळीच गरज नाही.
वैदिकांचे पाश, सामाजिक बांधिलकी आणि सिंहावलोकन
जंगलाचा राजा म्हंटला जाणारा सिंह प्रत्येक पाच पाऊलानंतर मागे वळून पाहतो. आज लिंगायत समाजाने पण सिंहावलोकन करण्याची  गरज आहे. लिंगायतांच्या इतिहासाची पाऊले पुसणारी  काही वैदिक भटावळ तयार होत आहे.  सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने लिंगायत धर्म आज पेच प्रसंगात सापडलेला दिसतो, वैदिक व्यवस्थेचे आक्रमण मोठ्या प्रमाणावर आजही लिंगायतावर होत आहे. लिंगायत धर्माची तत्वज्ञान आणि आचारसुत्रे याचा बारकाईने अभ्यास करून आज समाजाने समजून घेणे खूप गरजेचे आहे.  सामाजिक बांधिलकी जपताना काही अंशी लिंगायत आपल्या तत्वज्ञानाला मुरड घालताना दिसत आहेत. त्या सत्येच्या पोटी नारायणापासून जन्मलेल्या सत्यनारायणाचे पूजन आणि वैदिक रुद्रासुक्तांचे पाठ श्रावण महिन्यात आणि गणपतीच्या दिवसात बऱ्याच लिंगायत करत असल्याचे माझ्या ऐकिवात आहे. वचन चळवळीपासून दूर गेल्याचा हा परिणाम आहे असे नक्की सांगता येईल. बसवण्णा आपल्या वचनात म्हणतात, निष्ठावान पतीला एकच पती असे पहा, निष्ठावान भक्ताला एकच देव आहे पहा. तरीही हे वचनाची जोपासणारे शरण आज अल्प प्रमाणात दिसत आहे.  म्हणून आज वचन साहित्य वाचून लिंगायतानी सिंहावलोकन करणे गरजेचे आहे. गणेशोत्सव, नवरात्री, मोहरम या सणांच्या वाढत्या प्रभावाखाली आज लिंगायत युवक खेचला गेला आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून युवकांनी या  सण-समारंभात भाग घेण्यास हरकत नाही पण वैदिकत्वाचे ढोल बडविण्याची त्यांना काही गरज नाही. भाईचारा निर्माण व्हावा यासाठी अवश्य सहभाग नोंदवावा पण आहारी जाऊ नये.  डॉ. एम. एम. कलबुर्गी म्हणतात, संग्रहास परिश्रम पाहिजेत, संकलनास आणि पांडित्य पाहिजे, संपादनास परिश्रम, पांडित्य आणि प्रतिभा तिन्ही आवश्यक आहेत. असे असेल तर आज लिंगायतांनी  चार पाऊले पुढे टाकताना एकदा मागे वळून पाहिले पाहिजे. आम्ही नक्की संग्रह कशाचा केला,  आम्ही बसवादि शरणांच्या विचारांचा वचनांचा संग्रह कधी केला का ? आम्ही महापुरुषांच्या विचारांचा संग्रह कधी केला का ? आम्ही दाभोलकर, पानसरे  आणि कलबुर्गी यांच्या साहित्याचा आणि विचारांचा संग्रह कधी केला का ? याचे सर्वांना आत्मपरीक्षण करावे लागेल. आजच्या तथाकथित माता बारा महिने वैदिकांच्या व्रत-वैकल्यात अडकलेल्या , व्हाट्सअपच्या जंगलात रस्ता हरवुन बसलेल्या दिसून येतात. एका बाजूला महिलांची ही अवस्था तर पुरुषांची अवस्था याहून वेगळी नाही, टेलिव्हिजन, सोशल मिडिया यामध्ये गर्क असणारा पुरुषवर्ग आपल्याला दिसत आहे. जर मातापित्याची ही अवस्था असेल तर त्या मुलांकडून काय अपेक्षा ठेवायची. आजचे मातापिताच लिंगायत तत्वज्ञानाचे बाबतीत अनभिज्ञ दिसत आहेत, तर मुलांकडे ते येणार कोठून ? मूळ स्वरूप बदलुन काही अंशी संज्ञा त्याच राहिल्या, काही ठिकाणी नावे तीच स्वरूप मात्र बदलले. म्हणून अष्टावरणातील नावे तीच असली तरी त्यांचे संज्ञा इत्तरांपेक्षा वेगळ्या पहायला मिळतात. (उदा.- गुरू: अरिवे गुरु). सद्य परिस्थिती मांडत असताना सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, साहित्य , धार्मिक या सर्व बाबींचा आपल्याला विचार करावा लागेल.  संगीत, नृत्य , नाट्य, कला इ. क्षेत्रात लिंगायतांचे किती योगदान आहे. सामाजिक क्षेत्रात राजकारण, समाजसेवा, सेवाभावी संस्था यात काम  करणारे किती लिंगायत आहेत.  शिक्षक, प्राध्यापक, खाजगी शिक्षण संस्था चालविणारे लिंगायतांची संख्या किती आहे हे पण पाहिले पाहिजे.  बँक, पतसंस्था किंवा अन्य वित्तीय व्यवहार करणारे लिंगायत कितपत आहेत. लेखक, संशोधक, प्रकाशक या क्षेत्रात कार्य करणारा किती लिंगायत समाज किती आहे. याचे पण तुलनात्मक वर्गीकरण करावे लागेल.
सिद्धांतशिखमणीत ५-६ श्लोकात वीरशैव मत असा उल्लेख आला आहे. सिद्धांत शिखमणीत लिंगायत धर्म उल्लेख नाही. वीरशैव मत म्हंटले आहे धर्म कोठेच नाही. मत ही वेदातील काही ऋचा वर आधारित असतात. मत हे धर्म होऊ शकत नाही. दगडातून कोण जन्म घेईल, हे विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध करता येत नाही. जर पंचाचार्य दगडातून जन्मले तर आत्ता का जन्म घेत नाहीत.  सिद्धांतशिखमणीतील भरपूर गोष्टी या ऋग्वेदातील काही भागावर, उपनिषदे आणि आगम यावर आधारित आहे. शरणांनी षटस्थळ सांगितला पण या कृत्रिम सिद्धांत शिखमणीत या षटस्थल सिद्धांतावर आधारित एकशे एक वेगवेगळे स्थळ सांगितले आहेत. या मध्ये फक्त षटस्थळ सिध्दातांचे वैदिकीकरण करणे हाच हेतू दिसतो. मूळ भक्त महेश प्रसादी प्राण शरण आणि ऐक्य हे सिद्धांत शरणांच्या अनुभवातून जन्मले. ते अवैदिक असतानाही त्याला वैदिकत्वाची नकली झालर घालण्याचे काम सिद्धांतशिखमणीकरांनी केले. त्यासाठी त्यांनी कृत्रिम रेणुकाचार्य निर्माण करून भाकडकथा रचल्या. खुद्द सिद्धांत शिखमणीत वीरशैव शब्दाची व्याख्या केली आहे,ती अशी- जे लोक लिंगाची सिंहासनावर ठेवून पूजा करतात ते वीरशैव आहेत.  इष्टलिंग हे डाव्या हातावर घेऊन पूजा करतात. फक्त स्थावर लिंग सिंहासनावर किंवा जमिनीवर ठेवून पूजा करण्याची पद्धत आहे. डॉ एम एम कलबुर्गी सरानी संशोधन करून पंचाचार्यांचे असली रूप आणि वीरशैव इतिहास भूगोल ही दोन पुस्तके लिहिली आहेत त्या पुस्तकांच्या आधारे खाली लिहीत आहे
वीरशैव धर्म कोणता? मन्मथ स्वामींचा आणि वीरशैवांचा संबंध काय ? ज्या माऊलीने  यज्ञाचा धीक्कार केला त्या माऊलीचा वीरशैव हा उल्लेख हे आमुचे  खूप दुर्दैव आहे.  मन्मथ स्वामी स्वतःला महात्मा बसवण्णाचे तान्हे बाळ म्हणतात. डॉ एम एम कुलबर्गी सरांचे वीरशैवाचा इतिहास भूगोल आणि पंचाचार्यांचे असली रूप हे दोन पुस्तके वाचा. वीरशैव धर्म ७००० वर्षांपूर्वीचा नाही. आणि काशी हे पंचपीठात नव्हते.  वीरशैव हि चतुराचार्य परंपरा आहे. बसवण्णा वचनात  सांगतात ब्राम्हण कितीही श्रेष्ठ उच्च झाला  तरी आपल्या शेंडी आणि जाणव्याचा मोह टाळू शकत नाही.  असे वचनात बसवण्णा श्रीशैल जगदगुरू पंडितराध्या विषयी लिहतात.  यावरून हे दिसते  पंचपिठाधीश पंचाचार्य हे ब्राह्मण आहे ते वैदिक आहे.  लिंगायत हा पूर्णपणे अवैदिक धर्म आहे. काशी पीठ हा गोसावी लोकांचा मठ आहे. पंचपीठाच्या परिसरात लिंगायत नाहीत. लिंगायत स्थावरलिंगाची पूजा करत नाहीत. ते वेद पुराण  आगम निगम शास्त्र जोतिष मानत नाहीत.  लिंगायत हा विश्वधर्म आहे.  लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे ते हिंदू नाहीत किंवा वीरशैवही नाहीत ते फक्त लिंगायत आहेत. ते कायक दासोह समता समानता मानतात. आज पर्यंत काशी पिठाचे ६२ जगद्गुरू झाले आहेत. यावरून काशी पीठ हे पाचवे पीठ म्हणून अलीकडे मान्यता पावले आहे. असे सिद्ध होते.  रंभापुरी पिठाचे एकूण ३८७ जगद्गुरु झाले आहेत यावरून हे पीठ एकाच शतकात स्थापन झाले नाही असे सिद्ध होते.  काशी वगळता इत्तर चार पीठ (रंभापुरी, उजैन, श्रीशैल, केदार) काशी पिठाच्या पूर्वीचे आहेत. त्यामुळे ते ४ पीठ चतुराचार्य नावाने ओळखले जात होते. काशीपीठ हा गोसाव्यांचा मठ आहे त्यांनी चतुराचार्याच्या साहाय्याने स्वतःला जगद्गुरू घोषित केले हे सर्व पंचाचार्य झाले.लिंगायत अवैदिक धर्म आहे तर वीरशैव वैदिक आहेत. लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवण्णा आहेत. वीरशैव आणि लिंगायत दोन्ही परस्पराहून वेगळे आहेत. जे स्थावरलिंगाची पूजा करतात ते लिंगायत नाहीत. मन्मथ स्वामी इष्टलिंगाशिवाय इतर देवांना अथवा स्थावर लिंगाला नमस्कार करणे वर्ज मानतात :
इष्टलिंग हृद्यावरी । अन्य देवा नमस्कारी ।। महापाप तया जोडे। तेणे  अध:पात घडे।।करीता दुजे ठायी रती तेणे होय अधोगती ।। अंग लिंगासी अर्पिले। तेव्हा तयाचेची झाले ।। मन्मथ म्हणे नेणती धर्म। न पाहती धर्माधर्म ।। इष्टलिंग लोळत असे उरावरी । अन्य स्थावरा दंडवत घाली ।। त्याचे मुख देखता अंघोळी । वस्रसहित करावी।। अमान्य करुनी हृदयीचे लिंग । जो धरी स्थावरी भक्ती अंग ।। तो शिवभक्त नोहे केवळ सोंग । बहुरूपीयचे ।।
ज्यांनी १०० वर्ष वीरशैव म्हणवून घेतले त्यांना जीवनाच्या सरतेशेवटी आपण लिंगायत आहोत हा साक्षात्कार झाला. आता ते लिंगायत आहेत. आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ  येवू नये असे वाटत असेल तर , अल्पसंख्याक धर्ममान्यतेच्या लातूर मोर्च्यात सामील व्हा.
वैदिक व्यवस्थेची पाळंमुळं खणून काढण्यासाठी सामील व्हा.  तथाकथित पंचाचार्य, शिवाचार्य आणि जंगम यांनी अवैदिक लिंगायत समाजावर केलेल्या आणि करत असणाऱ्या अन्यायातून मुक्त व्हा. वैदिक शिवाचार्यांना प्रतिमोर्चे काढावे लागले, लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून जागृत झाला हेच आमच्या सर्व मोर्चाचे यश आहे. जाती जंगम हटाव, लिंगायत बचाव.

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.

 

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
डॉ. एम. एम. कलबुर्गी: साहित्य क्षेत्रातील अजरामर रत्न

  डॉ . एम. एम. कलबुर्गीचा जन्म विजयपूर जिल्हा, सिंदगी तालुक्यातील गुब्बेवाड या गावी झाला. यरगल्ल बीके गावचे मडिवाळप्पा आणि

Close