डॉ. एम. एम. कलबुर्गी: साहित्य क्षेत्रातील अजरामर रत्न

1 min read

 

डॉ . एम. एम. कलबुर्गीचा जन्म विजयपूर जिल्हा, सिंदगी तालुक्यातील गुब्बेवाड या गावी झाला. यरगल्ल बीके गावचे मडिवाळप्पा आणि गौरम्मा या लिंगायत शेतकरी दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला.  भाषा विषयात त्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी एम. ए. कन्नडमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून ते विश्वविद्यालयात प्रथम आले. अखंड परिश्रम, स्वतंत्र चिंतन आणि आशयसंपन्न लेखन यातून त्यांनी यशाची शिखरे गाठली. पुढे उमादेवीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक पुत्र आणि  तीन कन्या अशी एकूण चार अपत्य झाली. डॉ. कलबुर्गी यांनी कर्नाटक विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य केले तेथील निवृत्तीनंतर कन्नड विश्वविद्यालयाचे कुलगुरू होऊन सेवानिवृत्त झाले.

कन्नड साहित्य संशोधनातील नवे मार्गदाते. डॉ. कलबुर्गीनी साहित्य, संशोधन, ग्रंथसंपादन, नामविज्ञान आणि वचनसाहित्य संशोधनात वेळोवेळी वेगवेगळे प्रयोग केले. त्यांचे लेखन, संशोधन, संपादन याला एक नाविन्यपूर्ण झालर आहे. वाचकांच्या हृदयाला भिडणारी अशी त्यांची नाविन्यपूर्ण लेखन शैली आहे. मार्ग नावाने त्यांनी लिहिलेले सात खंड अतिशय समर्पक आहेत.

विचार आणि आचार यांचे समरस्य पावलेले डॉ. कलबुर्गीचे जीवन अत्यंत सरळ,सात्विक आणि विनम्र होते. सत्यावर निष्ठा, निर्मोही , निस्वार्थी स्वभाव.  पंप प्रशस्ती मिळाल्यानंतर आंबिल, कांबळे हीच माझी संपत्ती बाकी सगळे जास्ती असे म्हणून पुरस्काराची पूर्ण रक्कम परत करून त्यांनी नवा आदर्श घालून दिला.

संशोधनाच्या बाबतीत कलबुर्गी सर म्हणतात, भारतासारख्या भावनिष्ट राष्ट्रात संशोधन म्हणजे सरळ, सुलभ मार्ग नव्हे. ह्या देशात संशोधकांना वेळोवेळी लहानसान सुळावर चढावेच लागते. अनेक अग्निकुंडे पार करावी लागतात. तथापि पायाखालील निखाऱ्यापेक्षा डोळ्यापुढे असणारा प्रकाश महान असतो. संशोधनासाठी म्हणून संशोधन करणे नव्हे, तर समाजाच्या प्रगतीस कारणीभूत ठरणे ही संशोधनाची जबाबदारी असावी, असा त्यांचा आग्रह होता.

वचन साहित्याचे अधिष्ठान

डॉ. एम. एम. कलबुर्गीच्या संशोधनाचे मूळस्रोत म्हणजे शिलालेख, हळेगन्नड काव्य,  पंप आणि वचनसाहित्य आणि बसव सिद्धांत होय. त्याच्या लेखनशैलीवर वचन साहित्याचा गाढा प्रभाव आहे.

लिंगायतांचा इतिहास

डॉ. एम. एम. कलबुर्गी लिंगायतांचा इतिहास, वचनसाहित्य संशोधन, शिलालेख अध्ययन, संपादन, परिष्करण, प्रकाशन निर्देशन या क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय आहे.

डॉ.कलबुर्गीच्या मते लिंगायतांच्या इतिहासाचा आरंभ हा लाकुलीश पाशुपात शैवांपासून करतात.  बसवधर्म हा लाकुलीश पाशुपताचे संतान आहे असे सांगून कोंडगुळी केशिराज, जेडरदासिमय्या, हुळीयुमेश्वर चिक्कय्या यांची स्थावरनिष्ठा ही लाकुलीश पाशुपातांच्या प्रभावाचे द्योतक असून  ते त्या मताचे असावे अशी पुष्टी देतात. शरण चळवळीचा अरुणोदय हा बिज्जलपूर्वी, सहाव्या विक्रमादित्याच्याहीपूर्वी, चालुक्य जयसिंहाच्या काळापर्यंत  नेतात. डॉ. कलबुर्गीचे अधिकतर संशोधनक्षेत्र  वचनसाहित्य व लिंगायत संस्कृतीने व्यापले आहे. मार्ग मध्ये त्यांनी केलेल्या लेखनापैकी ३५ ते  ४०  टक्के संशोधन हे शरण आंदोलनाशी  संबंधित आहे.

शिलालेख संशोधनातील योगदान

लिंगायत साहित्य, इतिहास, परंपरा याविषयीचे डॉ. कलबुर्गीचे शिलालेख संशोधन कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. बसवादी शरणांची लिंगायत विचारधारा बलिष्ठ करण्याच्या दृष्टीने डॉ. कलबुर्गीचे या क्षेत्रातील योगदान चिरंतन आहे. म. बसवण्णांच्या विषयी १८ शिलालेखांची यादी केली आहे. त्यात संमत आणि असंमत असे वर्गीकरण करून ११ शिलालेख मानण्यात आले आहेत.  शिलालेखात हरिहर, राघवांक, लक्कन दंडेश, पंडितराध्य, पाल्कुरिके सोमनाथ या कवींची ग्रंथातील संदर्भ देऊन शिवशरणांची यादी करण्यात आली आहे. कर्नाटकात २५ हजार शिलालेख चाळून त्यातुन १३६ शिलालेख निवडुन त्यात ९० शरणांचा प्रासंगिक उल्लेख असल्याचे स्पष्ट झाले आहे.  २३ पेक्षा जास्त शिलालेखात सिद्धरामेश्वरांच्या वचनांचा उल्लेख आहे. कर्नाटक सरकारने ‘ समग्र  वचन साहित्य जनप्रिय आवृत्ती प्रकटन योजना ‘ अंतर्गत डॉ. एम एम. कलबुर्गी यांच्या प्रधान संपादकत्वाखाली उपलब्ध २१ हजार वचने,  १० हजार पृष्ठसंख्या असणाऱ्या १५ खंडात प्रकाशित झाली. वचन साहित्य: बहुभाषा अनुवाद योजना अंतर्गत २३ भाषेत २५०० वचनांचे अनुवाद ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.  डॉ. कलबुर्गीनी वचनसाहित्य सातासमुद्रापार पोहचविण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे.  कल्याणची अवनती हे नाटक त्यांनी लिहिले, यात बागेवाडी, बसवकल्याण कुडलसंगम येथील बसवण्णांचे जीवनाचे चित्रण केले आहे, क्रांती संघर्ष स्पष्ट केला आहे.  शेवटी अग्रहार संस्कृती, मंदिरसंस्कृती आणि राजसंस्कृती यांनी प्रतिकांती कशी घडवुन आणली याचे चित्रण केले आहे.

ग्रंथ संपादन, संकलन , साहित्य निर्मिती करत असताना ग्रंथ प्रकाशन निर्देशनासाठी डॉ. कलबुर्गीनी अनेक मठसंस्था, संघसंस्था,समाज संघटना यांना निर्देशन दिले. त्यांनी काही संस्था स्थापन केल्या त्यांची नावे अशी:

१.  लिंगायत अध्ययन अकॅडमी, बेळगावी.

२. मालेनाडू लिंगायत अध्ययन संस्था, आनंदपुरम

३. जगद्गुरू शिवरात्रीश्वर ग्रंथमाला, सुत्तूर मठ, म्हैसूर.

४. गडीनाडू शरण संस्कृती अकॅडमी, निडसोसी.

५.  बसवेश्वर अध्ययन संस्था, कोडेकल्लू.

६. चेन्नवीर प्रतिष्ठान, सारंग मठ, सिंदगी.

७. श्री वीरनारायण संस्कृती प्रतिष्ठान, गदग.

८. लिंगायत अध्ययन पीठ, जंबगीमठ.

९. अंगडी संस्कृती प्रतिष्ठान, कोप्पळ.

१०. विद्यावर्धक संस्था , धारवाड.

११. कर्नाटक विश्वविद्यालयातील कन्नड अध्ययन पीठ, धारवाड.

१२. बसवधर्म प्रसार संस्था, हिरेमठ संस्थान, भालकी.

महाराष्ट्र बसव परिषदेच्या पुस्तकांना त्यांचे निरंतर मार्गदर्शन लाभले आहेत. डॉ. एम. एम. कलबुर्गीनी लिंगायत साहित्य संस्कृतीस वैभव प्राप्त करून दिले आहे.

डॉ. एम. एम. कलबुर्गीच्या हत्येचे कारण

९ जून २०१४ ची घटना. बंगळूरच्या  विज्ञान भवनात  अंधश्रद्धामुक्त समाज, कर्नाटक अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा अंमल यासबंधी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. यु. आर. अनंतमूर्ती यांनी आपल्या एका लिखाणात  लहानपणी आपण (म्हणजे यु. आर. अनंतमूर्ती यांनी)  एका मूर्तीवर मूत्रविसर्जन करूनही आपल्याला काहीच अपाय झाला नसल्याचे नमूद केले होते. याचा दाखला (उदाहरण) फक्त डॉ. कलबुर्गीनी दिले.  त्यांच्या भाषणात डॉ. कलबुर्गी म्हणाले- देवमूर्तीच्यात रक्षण करण्याचे किंवा सतावण्याचे सामर्थ्य नसते, पूजा न केल्याने काही अपाय होत नाही , असे प्रतिपादन त्यांनी केले.

डॉ. यु. आर. अनंतमूर्तींनी जे बोलले त्याचा दाखला देऊन डॉ. कलबुर्गी बोलले.  तरीही सनातन संप्रदायवाल्यांनी हेतुपुरस्कर अनंतमूर्तीना सोडून कलबुर्गीविरुद्ध गदारोळ उठविला व त्यांना बळीचा बकरा केला.  कलबुर्गीनी कधी आपली पायरीसोडून अर्थहीन पुराव्याआभावी विधाने केली नव्हती,  ठोस  आधार असल्याशिवाय डॉ. कलबुर्गी कोणतेच मत मांडत नसत.  परंतु सनातनी शक्तींनी कावा साधला.  दि. ३० ऑगस्ट, २०१५ रोजी सकाळी- सकाळीच त्यांची गोळ्या घालून हत्या केली आणि आपली सैतानी भूक शमविली.  सनातन्यांनी गोळ्या घालून भले डॉ. कलबुर्गीची हत्या केली असेल पण साहित्याच्या पानात, इतिहासाच्या पानापानावर कलबुर्गी अजरामर राहिले आहेत.

संदर्भ:

  • ग्रंथऋण: धीमंत सत्यशोधक डॉ. एम. एम. कलबुर्गी. संपादन: राजू जुबरे. प्रकाशन: हिरेमठ संस्थान, भालकी.
  • वृत्तपत्र: दैनिक पुढारी, तरुण भारत, सकाळ ( १ सप्टेंबर, २०१५.)
  • Why Kalburgi was killed. (The Indian express)
  • मासिक: बसवपथ

 

फोटो सौजन्य:  http://www.deccanherald.com

 

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.

 

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
वाय. एस. एस. संघटनेतर्फे चालु असलेल्या आमरण उपोषणास ‘बसव ब्रिगेड’ चा जाहीर पाठींबा

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे वाय. एस. एस.संघटनेतर्फे चालु असलेल्या आमरण उपोषणास 'बसव ब्रिगेड' चा जाहीर पाठींबा

Close