लिंगायतांचे आहारविषयक शास्त्र

1 min read

लिंगायतांची स्वतःची स्वतंत्र आहार पद्धती आहे. काही विशिष्ट प्रदेशात प्रदेशात उपलब्ध होणाऱ्या वनस्पती धान्य, भाज्या, कडधान्ये या पासून शुद्ध आणि सात्विक आहार तयार केला जातो. गव्हाची खीर, तांदुळाची खीर,डाळगा, मुगदी, चोंबे हे विशेष प्रसिद्ध आहेत. बसवकाळात मादार चेन्नय्यांच्या घरची खीर प्रसिद्ध होती. कल्याणच्या सभोवतालचे ३५ की. मी पर्यतचे शरण बांधव खीर खाण्यासाठी कल्याणला येत असत असे सांगितले जाते.

लिंगायतांच्या आहारविषयक धारणा ‘क्रांतीविरंगणा, वैराग्यनिधीं अक्कमहादेवी’ यांच्या खालील वचनात सुस्पष्टपणे समोर आलेल्या आहेत.

आहार कमी करा अण्णा, आहार कमी करा
आहारामुळे व्याधि वाढुनी बलिष्ठ होती देवा
आहारामुळे निद्रा, निद्रेमुळे तामस-अज्ञान-देहविस्मरण
आहारामुळे कामविकार वाढती, कायाविकार, मनोविकार
इंद्रियविकार, भावविकार, वायुविकार निर्माण होती
सृष्टीनिर्मितीची कारण कायेचे अतिपोषण नको
अतिपोषणाने मृत्यु येई
जप-तप-ध्यान-धारणा पुजेला सुक्ष्म तनु मात्र पुरेल ?
तनु पोसणारी आशा विरक्तीला विघ्न आहे
तनु तामस वाढी, अज्ञानाने विरक्ती हानी
ज्ञान नष्ट,परब्रम्ह दुर, निर्दिष्ट स्थिती नसल्यामुळे
चन्नमल्लिकार्जुनाला प्रसन्न करुनी घेण्यासाठी आलेली काया नष्ट न करीता रक्षण करी देवा

क्रांतिविरांगणा महादेवी अक्का आपल्या वचनात आहारावर नियंत्रण ठेवण्यास सांगतात. आहारावर नियंत्रण नसेल तर कोणत्या विकारांना सामोरे जावे लागेल तेही सांगतात.

गरजेपेक्षा अधिक अन्न ग्रहण केल्यास व्याधी बळावतात. अति आहारामुळे झोपेचे प्रमाण वाढते, तामसिक भाव वाढतात. ज्ञानाचे विस्मरण होते, कामवासनेसंबधी विकार वाढतात, मन स्थिर राहत नाही, द्विधा मनस्थिती होते. राजस भाव कमी होतो तामस भाव वाढतो. वायूविकार निर्माण होतात, अपचनाचे त्रास होतात. अतिलठ्ठपणा येतो, मधुमेह, रक्तदाब यासारखे रोग होतात. शरीराला आवश्यक असणाऱ्या आहारापेक्षा जास्त आहार घेतला तर हे सर्व कायाविकार जडून मृत्यू येतो. जप, तप, ध्यान- धारणा जप यासाठी स्थूल शरीराची आवश्यकता नाही. सूक्ष्म देह पुरेसा आहे. शरीराचे पोषण करण्याची इच्छा विरक्त अवस्थेला घातक आहे. शरीरात तामस भाव वाढतात, तामस भावाने अज्ञान वाढते. अज्ञान हे ज्ञानासाठी घातक असते. निराकार, निर्गुण ईश्वराला जाणण्यामध्ये अडथळे येतात. चेन्नमल्लिकार्जुनाला प्रसन्न करण्यासाठी काया नष्ट न करता रक्षण करायला हवे, त्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवायला पाहिजे.

शरणांनी आहारावर नियंत्रण ठेवायला सांगितले आहे. शरीराला त्रास देऊन उपवास करण्यापेक्षा जेवण करावे, लिंगपुजा करावी. कपडेलत्ते देऊन जंगम तृप्त करावा. शरीराला त्रास देऊन उपवास केल्यास तो आत्मद्रोह होतो.

सोमवार, एकादशी, संकष्टी, प्रदोष हे उपवास लिंगायतानी करू नयेत असाच शरण अनुभव आहे. कोणतेच उपवास करू नये अशी शिकवण लिंगायतांना दिली जाते आणि सतत कायकामधे मग्न असणाऱ्यानी आहार टाळणे सुद्धा चुकीचे आणि हानिकारक आहे. काडसिद्धेश्वरांचे खालील वचन याबाबतच्या लिंगायत धारणा व परंपरा यांची माहिती देते.

दिनचर्यात, मासात, सप्ताहात सोमवार उपवास करावा म्हणतात
व्दादश मासात श्रावण सोमवार उपवास करावा म्हणतात
माघ मासाच्या चतुर्दशी दिवशी उपवास रात्री जागरण करावे म्हणतात
असे वार मास तिथिंच्या दिवशी अन्नपाणी सोडून, उपवास करून, आत्म्याला क्लेश देवून, देहाला दुर्बळ करून, तुम्ही व्रत आचरिल्यास तो तुमचा आत्म द्रोह, त्या देवतांना दु:खवून परत भव भवात जाणार
या कारणे उपवास करू नयेत. उपवास करण्याने प्रयोजन नाही.
ते कसे म्हणजे: जेवण करून लिंग पूजा करावी. जेवण कपडालत्ता देवून जंगम पूजा करावी. असे त्रिविधाचे भेद जाणलेले उपवास करू नये म्हणतात.
काडनोळगाद शंकरप्रिय चेन्नकदंबलिंग निमाय प्रभूवे.

शरण काडसिद्धेश्वर आपल्या वचनात उपवास करण्याला विरोध करतात. सामान्यतः उपवासविषयक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात जसेकी आठवड्यात, महिन्यात नियमितपणे सोमवार उपवास करावा, वर्षात येणाऱ्या श्रावण महिन्यात सोमवार उपवास करावा, महाशिवरात्री उपवास करावा, जागरण करावे असे म्हणतात. अशा वार, महिन्यातील तिथीला अन्न त्याग करून आत्मक्लेश करतात, देहाला दुबळे करतात. यासाठी उपवास करू नयेत, त्यासाठी काही प्रयोजन नाही. त्यापेक्षा जेवण करून इष्टलिंगपुजा करा. जेवण,कपडे देऊन जंगम (येथे जात असा अर्थ घेऊ नये, जंगम ही संज्ञा आहे. लिंगायत धर्मप्रसारक म्हणजे जंगम. जंगमत्व जातीने नाही कर्माने प्राप्त होते. जंगम शब्दाचा दुसरा अर्थ समाज असा आहे. जंगम हा जातीवाचक शब्द नाही. ) तृप्त करावे. ज्यांनी हे तीन भेद जाणले ते उपवास करू नका म्हणून सांगतात. काडनोळगाद शंकरप्रिय चेन्नकदंबलिंग निमाय प्रभूवे हे शरण काडसिद्धेश्वर यांचे वंचनांकित आहे.

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
निवृत्त पोलीस श्री. भालचंद्र सदाशिव लोखंडे यांचे लिंगैक्य

कडेगाव: येथील निवृत्त पोलीस श्री. भालचंद्र सदाशिव लोखंडे (वय ७७) यांचे लिंगैक्य झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना,

Close