अहिंसामूर्ती किन्नरी ब्रम्हय्या

1 min read

शरण किन्नरी ब्रम्हय्या हे ऊडुरु येथील रहिवाशी होते. ते सोनार म्हणून कायक करत होते. बसवण्णांची कीर्ती ऐकून ते कल्याणला येतात, तेथेच वास्तव्य करतात. कल्याणच्या मंदिरात एकतारी वाजविण्याचे कायक करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते जंगमदासोह करतात. ते एकतारी वाजविण्याचे कायक करत असल्याने त्यांना किन्नरी असे म्हंटले जाते.

शरण किन्नरी ब्रम्हय्या आणि महात्मा बसवण्णा

एकदा बसवण्णांच्या महामनेत संध्याकाळच्या वेळी दासोह घेण्यासाठी शरण येतात. त्यात किन्नरी ब्रम्हय्या पण असतात. प्रसाद घेत असताना ब्रम्हय्या एका शरणांकडे कांदा मागतात. बसवण्णा उपहासाने ब्रम्हय्यांना  म्हणतात, ” तुम्ही कांदा खाता ? ”  बसवण्णांच्या या उपहासाच्या बोलण्याने ब्रम्हय्या रागावतात आणि महामनेतून जेवण सोडून निघून जातात.  ब्रम्हय्या रागाने निघून गेल्यानंतर बसवण्णांना वाईट वाटते. ब्रम्हय्यांची समजूत काढण्यासाठी बसवण्णा दुसऱ्या दिवशी ब्रम्हय्यांकडे जातात. त्यांना भेटायला जाताना त्यांना कांदे आवडतात म्हणून एक बैलगाडीत भलीमोठी कांद्याची प्रतिकृती तयार करून ती बैलगाडी कांद्याने सजवितात. त्यांच्यासाठी कांदे भेट म्हणून घेऊन जातात. ब्रम्हय्यांची समजूत घालतात, दोघेही एकमेकांच्या गळ्यात मिठी घालून “शरणू” म्हणून नमस्कार करतात. या प्रसंगावरून बसवण्णांची नम्रता आणि क्षमाशीलता दिसून येते, बसवण्णा जसे बोलले तसे जगले. म्हणूनच ते म्हणतात- “बोलल्याप्रमाणे वागले नाही तर कुडलसंगमदेव कसा प्रसन्न होईल.” बसवण्णा आपल्या वचनातून कोणीही माझ्यापेक्षा लहान नाही असे सांगतात,

कोणीही माझ्यापेक्षा लहान नाही,

शिवभक्तांपेक्षा महान नाही,

याला माझे मन साक्षी,

तुमचे चरण साक्षी, कुडलसंगमदेवा

अहिंसामूर्ती किन्नरी ब्रम्हय्या

एकदा त्रिपुरांतक मंदिरात एक जार त्याच्या वेश्येच्या नवसपूर्तीसाठी  एक बकरी बळी देण्यासाठी येतो. बळी देण्यापूर्वी ती बकरी गळ्यातील बांधलेल्या  दोरीतुन सुटते, ती मंदिरात जाते. बकरीच्या मागे जार पण मंदिरात येतो, त्या बकरीला पुन्हा दोरीने बांधतो. ती बकरी मरणाच्या भीतीने जोरात ओरडत असते. ते पाहून किन्नरी ब्रम्हय्या त्या जाराला त्या बकरीचा बळी देऊ नये , म्हणून सांगतात. तो जार काहीही झाले तरी ब्रह्मय्याचे ऐकायला तयार नसतो . ब्रम्हय्या आणि जार यांच्यात भांडण होते. शेवटी ब्रम्हय्या त्या बकरीचा किंमत देऊन बकरीला सोडवून घेतात.

ब्रम्हय्या आणि अक्कामहादेवी

अक्कमहादेवीना कल्याणमध्ये भेटलेली पहिली व्यक्ती म्हणजे किन्नरी ब्रह्मय्या.  किन्नरी ब्रह्मय्या अक्कमहादेवीची परीक्षा घेतात.महादेवी अक्कांची प्रगल्भता, तात्विक ज्ञान अध्यात्मिक उंची पाहुनी अक्कासमोर नतमस्तक होतात. आपल्या एका वचनात महादेवी अक्कांचे महात्म्य सांगतात. “वाघाच्या जबड्यातून वाचलो शरणूशरणार्थी, आई.”

कल्याणक्रांतीमधील ब्रम्हय्यांची भूमिका

शरण ब्रम्हय्यांनी वचन साहित्य संरक्षणासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. कल्याणक्रांतीनंतर बिज्जलाचे सैन्य आणि शरण यांच्यात युद्ध सुरू झाले. बिज्जलाच्या सैन्याने शरणांच्या कत्तली करण्यास सुरवात केली, वचन साहित्य नष्ट करण्यास सुरुवात केली. चेन्नबसवण्णांच्या नेतृत्वाखाली उळवीकडे निघालेल्या तुकडीमध्ये ब्रम्हय्यापण सहभागी होते. शत्रूशी झुंज देत-देत शरणगण वचनसाहित्य घेऊन उलवीला पोहचतात. उळवीत पोहचल्यावर चेन्नबसवण्णा ब्रह्मय्यांवर नदीकाठच्या संरक्षणाची जबाबदारी टाकतात. उरलेल्या सर्व  शरणांना घेऊन चेन्नबसवण्णा नदी पार करून पलीकडे जातात. उळवीच्या महामनेत वचनसाहित्य सुरक्षितपणे पोहचवतात. तोपर्यंत  ब्रम्हय्या नदीकाठावर अविरतपण बिज्जलाच्या  सैन्याचा मुकाबला करत असतात. शत्रू सैन्याला प्रतिकार करण्यासाठी उळवीच्या महामनेच्या बाहेर असणारी नदी ते गुहेकडे वळवितात, त्यामुळे शत्रूसैन्याला पुढे प्रतिकार करणे अशक्य होते. सैन्य माघारी फिरते. ब्रम्हय्यांनी वळविलेल्या नदीला  किन्नरी ब्रम्हय्यांची नदी म्हणतात.

ब्रम्हय्यांची वचने

१.

सायीचे गरम दूध

सुवर्णपात्रातून पिण्यास भूषण असे पहा,

पण, मृत्तिका पात्रातून पिण्यास असे का ?

मी केलेल्या शिवलिंग पूजेसाठी काया पवित्र असता,

अपवित्र कशी असेल, त्रिपुरांतकलिंगा ?

२.

तुझे तारुण्य, रुपलावण्य, चतुर बोलणे, संपत्तीचा संतोष,

हत्ती, घोडे, रथ, पायदळाचे समूह,

सती, सूत, आप्तबंधूंच्या समूहाचा,

तुझ्या कुलाभिमानाचा गर्व सोडून दे,

वेडा होऊ नकोस,

अरे, रोमजापेक्षा तू श्रेष्ठ आहेस का ?

मदनापेक्षा सुंदर आहेस का ?

सुरपतीपेक्षा सुंदर आहेस का ?

वामदेव, वशिष्ठापेक्षा श्रेष्ठ कुलीन आहेस का ?

यमदूत येऊन,

हात धरून नेऊ लागताच बोलण्यास वाव नाही .

अरे मानवा,

माझ्या महालिंग त्रिपुरांतक देवाची पूजा केली तर, अमरपदाची प्राप्ती होईल , वेड्या.

३.

असत्यरूपी तलवारीला देह बळी गेला.

काय म्हणावे या विधीच्या खेळाला.

शम-दमादि गुण अंगी बाणले नाहीत,

महालिंग त्रिपुरांतकाचे शरण हेच माझे मालक,

हे न ओळखले,

म्हणून भेद नि विस्मृतीत आपणच आश्रित झाले.

संदर्भग्रंथ

  • शरण जीवन दर्शन – राजू ब.जुबरे. महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान, भालकी.
  • वचन- संपादक: डॉ. एम. एम. कलबुर्गी, अनुवाद- सौ.  सविता सि. नडकट्टी, श्री शंकर म. पाटील. बसव समिती, बेंगळुरू.


ADVT


 

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
लिंगायतांचे आहारविषयक शास्त्र

लिंगायतांची स्वतःची स्वतंत्र आहार पद्धती आहे. काही विशिष्ट प्रदेशात प्रदेशात उपलब्ध होणाऱ्या वनस्पती धान्य, भाज्या, कडधान्ये या पासून शुद्ध आणि

Close