लाखाचा पोशिंदा: महाराष्ट्र कृषिदिन विशेष

1 min read

ज्याने आपल्या घामाने ही काळी माती भिजविली

अखंड श्रमाने ज्याने आपला देह राबविला

कष्ट उपसले पोटासाठी

ज्याने आपले तन आणि मन श्रमपूर्वक झिजविले,

श्रमाची पूजा करून शिवाची पूजा केली,

श्रमिकांच्या झोपडीलाच जो कैलास मानतो,

ज्याची वाणी तशी करणी आहे हे कुडलसंगमदेवा,

तोच जगद्गुरू झाला.

– महात्मा बसवण्णा.

 

शेतकरी म्हणजे नक्की काय ? दिवस रात्र काळ्या आईची सेवा करून लाख लोकांना पोसणारा लाखाचा पोशिंदा. मराठी भाषेत कवींनी अनेक कविता लिहिल्या आहेत .

काळ्या काळ्या मातीमधी पिकलंया सोनं

शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||

ज्या काळ्या मातीत पिकलेले धान्य हे सोने म्हंटले आहे. पण त्या सोन्याला सोन्याचा भाव मिळतो का ? आज हाच मोठा प्रश्न मला नेहमी पडतो. दुष्काळ, अवर्षण, अतिवृष्टी या नैसर्गिक समस्या असतातच. ओला दुष्काळ असो किंवा सुका दुष्काळ तो तर नेहमीच त्याच्या वाटेला येतो. त्यातून द्राक्षे, डाळींब यासारख्या पिकांवर वातावरणातील बदलाने परीणाम होतात, रोग पडतात. त्या रोगापासून आपल्या सोन्याचे रक्षण करण्यासाठी निरनिराळे औषध फवारणी आल्या. टॉमाटो, फ्लॉवर यासारख्या आणि फळांच्या साठवणीसाठी मोठ्या बागायतदारांच्या पाया पडून मुश्कीलीने कोल्ड स्टोरेज मिळवणे. त्या पिकाला चांगला भाव लगेच मिळेल असे नाही, पुन्हा मोठ्या व्यापाऱ्यांच्या मागे लागणे आले. तासगाव शहरात व्यापाऱ्यांनी आणि मोठ्या बागायतदारांनी मोठे कोल्ड स्टोरेज उभे करून उत्पन्नाचे नवे साधन निर्माण केले आहेत. पण गरीब शेतकऱ्यापुढे नैसर्गिक समस्या, शेती मालाला मिळणारा अल्प भाव या समस्या नेहमीच आहेत. बहिणाबाई म्हणतात,

राबतो कष्टतो माझा

शेतकरी बाप

लेतो अंगावर चिंध्या

खातो मिरची भाकर

काढी उसाची पाचाट

तेव्हा मिळते साखर.

त्यानेच कष्ट करून गोड साखर तयार करण्यासाठी ऊस नावाचा कच्चा माल तयार केला पण ती गोड साखर खाताना त्यांची आठवण हे चार भिंतीत राहणारे का काढत नाहीत ?

शेतकरी हा कायकजीवी समाज. स्वतः कायक करतो पण त्याच्या कायकाला म्हणावा तितका भाव मिळत नाही. त्याने पिकविलेल्या शेपू, पालक, मेथी, कोथिंबीर यासारख्या पालेभाज्या पावसाळ्यात कुजून खराब होतात तर उन्हाळ्यात वाळून जातात म्हणून कवडीमोल भावात विकावे लागतात. पण त्याच पालेभाजी, फळभाजीचे , फळांचे , धान्याचे भाव वाढले तर मात्र पांढरी कपडे घालणारा समाज शेतकऱ्यांच्या नावाने आरडाओरडा करतो. अरे बाबा तू जेवढे मूल्य देऊन ते खरेदी करतोस ते सर्व शेतकऱ्याला मिळते का ? त्यांच्या मध्ये व्यापारी नावाचे दलाल असतात ना ? आमच्या शेतकऱ्यांकडून कवडीमोल किंमतीत शेतमाल खरेदी करून तो अधिक मूल्य घेऊन विकतो. शेतकऱ्यांच्या जीवावर दिवसेंदिवस हाच वर्ग श्रीमंत होत आहे. बाजारभाव करणाऱ्या व्यक्ती दुष्काळ, अवर्षण, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्ती जेव्हा माझ्या बापावर येते तेव्हा कोठे गायब होतात ? याच आपत्तीमुळे शेतकरी खरा कर्जबाजारी होतो. त्यातून खाजगी सावकाऱ्याने सोडलेल्या व्याज नावाच्या जळू जणू माझ्या बापाच्या शरीराला चिटकून बसला आहे, बँका, पतसंस्था शेतीसाठी कर्ज देते पण या आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांचे व्याज कमी का करत नाही ?

शेतकऱ्याची कौटुंबिक अवस्था त्याहूनि वेगळी. शेतकरी हा एकत्र कुटूंबात राहणारा व्यक्ती. म्हाताऱ्या आणि आजारी आई वडिलांचे औषधोपचार, मुलांमुलींचे शिक्षण, मुलींची लग्ने या सर्वांना सामोरे जावे लागते. मुलांना चांगले व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी आर्थिक टंचाईचा मोठा प्रश्न असतो. मुलांच्या हौस मौज पूर्ण करणे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी जमेलच असे नाही. या सर्व प्रसंगातून, समस्येतून शेतकऱ्यांना पर्याय काढावा लागतो.

नांगराचा फ़ाळ आडे, तव्हा लागे धाप।

घाम गळे टप-टप, वलाचिंब बाप॥ध्रृ॥

रानामंधी उन्ह-पाणी बाप झाला काळा।

कसातरी भागवितो पोटाच्या या जाळा।

कर्जापायी-२ सावकार देई घरा ताप।

तव्हा मला आगतिक दिसे मव्हा बाप ॥१॥

दरसाली पेरणीला काढा लागे रिन।

उण्या-दुण्या बोलण्यानं कावून जाई मन।

भरल्या डोळ्यान्-२म्हणे मागल्या जन्मीचं हे पापं।

तव्हा मला कासाविस दिसे मव्हा बाप ॥२॥

माय माझी रोज म्हणे रिन नका काढू।

वरल्या-वरी पोट भरून पसा-पसा जोडू।

लेकराले-२ सुखी ठेवू नको असा शाप।

तव्हा मला देवावाणी भासे माय-बाप ॥३॥

सुगी येता बहरून दाणं-दाणं भरे।

माप जव्हा पदरात तव्हा चिंता सरे।

ढगफ़ुटी-२ कव्हा, कव्हा दुष्काळाचं माप।

तव्हा जीवा कटाळला दिसे मव्हा बाप ॥४॥

कसा-बसा माल काढून मोंढ्यामंधी नेई।

अर्धा माल चाळणीत अर्धा रिनात जाई।

व्यापारी हा-२ अडाण्याला मारी नवी थाप।

तव्हा मला अर्धमेला दिसे मव्हा बाप ॥५॥

मणून म्हंतो जीवा ऊठ शिकून मोठा होई।

‘साहेब’ होता घराची ही अवदसा जाई।

माय-बापा-२ फ़ुलागत जपून नोटा छाप।

तव्हा त्याच्या डोळा येई सुखाची ही झोप ॥६॥

कवी- दिलीप वि चारठाणकर

 

 

संदर्भ:

  • वचन (बसव समिती),
  • बहिणाबाईंची कविता-इ सहावी बालभारती
  • कविता- दिलीप चारठाणकर, सेलू यांची कविता.

 

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.ADVT


 

 

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
बसव ब्रिगेड सोलापूरच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

सोलापूर: 'बसव ब्रिगेड' संघटनेच्या सोलापूरच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये माळशिरस तालुक्यातील राहुल बिडवे यांची 'बसव ब्रिगेड' सोलापूर जिल्हा

Close