बसवादि शरणस्थळांची संस्कृती, वारसा आणि वसा

1 min read

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यात उगम पावलेली बसवादि शरण संस्कृती ही अवैदिक चळवळ रुपात उभी राहिली. हीच चळवळ पुढे लिंगायत नावांच्या अवैदिक धर्माच्या रूपाने नावारूपाला आली.  महाराष्ट्रातील सर्व जाती उपजातींचे आहार- विहार, संस्कार, स्वभावविशेषता, नावे, आडनावे, सण, उत्सव, भाषा, प्रथा-परंपरा, जन्म ते मृत्यू संस्कार, विवाह संस्कार, जनपदे, लोकम्हणी, बसवण्णा मंदिरे, शरणस्थळे, ग्रामनामे, समाधीस्थळे, धर्माचरण, शरणु शरणार्थी म्हणून अभिवादन करण्याची पद्धत, धर्मनाम, बसवण्णी पौर्णिमा,  बसव जयंती, विरक्त मठ परंपरा, शरीररचना, बसवपुराण, शिलालेख, अभंग, पोथ्या, मन्मथादि संत साहित्य, आदी साधनांचा अभ्यास केल्यास गेल्या ९०० वर्षात या समाजाने वसा आणि वारसा जोपासला आहे हेच सिद्ध होते.

बसवण्णा मंदिरे

महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा कर्नाटक राज्यात बऱ्याच ठिकाणी नंदी बसवण्णा मंदिरे आहेत. नंदी बसवण्णा मंदिरे ही बसवण्णांचे स्मृतिस्थळे आहे. बसवण्णा आणि शरणांच्या भेटीचे, वास्तव्याचे आठवण म्हणून अशी मंदिरे बांधण्यात आली आहेत. पुराणकारांनी बसवण्णा नंदीचे अवतार आहे असे बिभीत्स वर्णन केले आहे. या वर्णनाचा आधार घेऊन  बसवोत्तर काळात नंदी बसवण्णांचे मंदिर स्मृतिस्थळे म्हणून उभारले गेले.

डॉ. भीमराव पाटील आपल्या ‘शरण संस्कृतीचा मराठी भूप्रदेशावरील प्रभाव’ या संशोधनात्मक शोधनिबंधात म्हणतात, ” महात्मा बसवण्णा हे नंदीचा अवतार (खरे तर ते कोणाचा अवतार नव्हते तर ते एक महापुरुष होते) असे पुराणकारांनी रंगविलेले असल्याने बसवोत्तर काळात नंदीबसवण्णांची मंदिरे उभारली गेली आहेत.”

बसवण्णा मंदिर, मौजे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यात पुरातन आणि प्राचीन असे बसवण्णा मंदिर आहे. मौजे डिग्रज जास्तीतजास्त ९००० लोकवस्तीचे गाव. नांद्रे, ब्रम्हनाळ, कर्नाळ, नावरसवाडी, कसबेडिग्रज या गावांच्या भौगोलिक सीमा या गावाला लागून आहेत. गावाजवळून कृष्णामाई वाहते. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज या गावात प्राचीन बसवण्णा मंदिर आहे. या मंदिराचा अलीकडे जीर्णोद्धार झाला आहे. मंदिराचा सभागृह भव्य आहे, सभागृह आकर्षकपणे सजवलेला आहे. आतील बाजूने सभागृहाची रचना राजमहालासारखी आहे. मंदिर हे दुमजली आहे. सुंदर बांधकाम केले आहे. मंदिराचे गर्भगृह ४० × ४० चौ.मी. तर सभागृह  ४० × १००  चौ. मी. इतक्या क्षेत्रफळाचे आहे.

मंदिराच्या दक्षिणेला जिल्हा परीषदेची पहिली ते सातवी शाळा आणि मैदान आहे. मंदीराच्या मागे पश्चिमेला शाळेचे मैदान आणि रस्ता आहे, उत्तरेला लिंगायत समाजाची स्मशानभूमी मंदिराला लागून आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरासभोवतालचा परिसर पेव्हिंग ब्लॉक आणि शोभेच्या वृक्ष लावून सुशोभित केला आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात दोन नंदीच्या मूर्ती आहेत. नदीजवळ शिवलिंग अलीकडच्या काळात स्थापन केले आहेत. पूर्वी मंदिरात फक्त नंदी होते. मंदिरातील दोन्ही नंदी एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत. मंदिरात उत्सवमूर्ती आहे. मंदिराचे एकूण क्षेत्रफळ ३९०९.७ चौ.मी आहे.

मौजे डिग्रज गावात लिंगायत समाजाची १५० घरे आहेत. लिंगायत धर्माच्या वाणी या जातीचे लोक येथे राहतात. लिंगायत वाणी समाजाला ८ गुंठे जागा स्मशानभूमीसाठी आहे. जंगम समाजाची एकूण २ घरे आहेत. येथील लिंगायत समाज शेती नोकरीवर उदरनिर्वाह करतो. जंगम समाजाला ४ गुंठे जागा स्मशानभूमी साठी आहे.या गावात वाणी समाजाचे कोरे, पाटील आडनावाचे लोक राहतात. हेच लोक मंदीरातील उत्सवाचे मानकरी आहेत. मंदिराला स्वतःची ६ एकर जागा आहे. सरकारी मानधन निधी मंदिराला नाही.

गावातील जैन, मुसलमान, हरीजन, मराठा यांची बसवण्णावर विशेष श्रद्धा आहे. श्री दानय्या जंगम सोळाव्या शतकात येथे आले, त्यांना मंदिराच्या पूजेचा अधिकार देण्यात आला. आज त्यांची सातवी पिढी पूजा करत आहे यावरून असे म्हणता येईल की हे मंदिर सोळाव्या शतकापूर्वीचे आहे. पण येथील ऐतिहासिक पुरावे नष्ट झाल्याने बसवण्णांचा इतिहास दंतकथेत अडकला आहे.

श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी बसवण्णांची पालखी काढली जाते. त्यावेळी नारळ फेकून फोडण्याची पद्धत आहे. महाशिवरात्री ला येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला प्रत्येक सासरवासीन गावात येते, ही परंपरा आजही गावकऱ्यांनी जपली आहे. गावातील लिंगायत बांधव येथेच बसवजयंती साजरी करतात. सुमारे ४०० वर्षांपासून येथे फक्त वीणा पारायणाची प्रथा आहे. शेवटी अन्नदासोह केला जातो. मंदिराची सर्व माहिती मंदिराचे पुजारी श्री दिलीप जंगम यांनी दिली, अभिषेक देशमाने यांनी संपादित केली.

महाराष्ट्रातील बसवण्णा आणि शरणची मंदिरे असणारी ठिकाणे

ब्याळी बसवण्णा (लातूर), निलंगा तालुक्यात पेठ, देवणी, लिंबाळा, शिवार येथे म. बसवण्णा मंदिरे आहेत.  उस्मानाबाद जिल्ह्यात मुरूम, जेवळी, आचलेर, लोहारा, उमरगा,सास्तुर येथे नंदी बसवण्णांची मंदिरे आहेत. कुर्डुवाडी, धर्माबाद येथे बसवण्णा मंदिरे आहेत. सोलापूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथेही अल्लमप्रभु, सिद्धरामेश्वर, बसवण्णा, अक्कमहादेवी, यांची स्मृतिमंदिरे आहेत. काही ठिकाणी गुहा आहेत.  सांगली जिल्ह्यातील संख (ता. जत) येथे निलंबिका मंदिर आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गुड्डापूर येथे श. दानम्मादेवीचे मंदिर आहे. कंटकूर ता. उमरगा आणि भूम येथे अल्लमप्रभुंचे मंदिर आहे. यावली बसवण्णा ता. हदगाव येथे जुने प्राचीन मंदिर आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यात देवरहळ्ळी चन्नबसवण्णांची गुहा आहेत. नाशिक मालेगाव येथे अक्कमहादेवीचे मंदिर आहे.  उस्मानाबाद येथे अल्लमप्रभूंची मंदिरे आहेत. सोलापूर येथे सिद्धरामेश्वर समाधी मंदिर आहे. सांगली जिल्ह्यात विटा तालुक्यात रेणावी येथे रेवणसिद्धांचे मंदिर आहे. सांगली जिल्ह्यातील मौजे डिग्रज येथे नंदी बसवण्णा मंदिर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आळते येथे अल्लमप्रभुचे स्मृतिमंदिर आहे. मंगळवेढा येथे रेवणसिद्धेश्वर मंदिर आहे आणि तालुक्यात बसवण्णांची अनेक मंदिरे आहेत. ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे देवांग मोहल्यात ५०० वर्ष जुने चन्नबसवेश्वर मंदिर आहे. उमरखेड जि. यवतमाळ येथे महात्मा बसवेश्वर मंदिर आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे श. उरलिंग पेद्दी राहत होते. त्यांचा इतिहास उपलब्ध आहे. आजही त्यांच्या नावाने शेकडो उरलिंग पेद्दी मठ आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात अकिवाट येथे बसवनकेरी, माळ, बसवेश्वर नगर आणि बसवेश्वरांचे मंदिर आहे. गावात बसव मंटप आहे. जयसिंगपूर जवळ मुख्य महामार्गाचे नाव बसवणखिंडी असे असून तेथे बसवण्णांचे मंदिर आहे.

 

संदर्भग्रंथ: संशोधनात्मक शोधनिबंध शरण संस्कृतीचा मराठी भूप्रदेशावरील प्रभाव. लेखक प्रा. डॉ. भीमराव पाटील

 

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही. सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.ADVT

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
वीरगणाचारी मडिवाळ माचीदेवाचे वचन

निर्वाह झाले देवा बसवण्णांचे कप्पडी संगमनाथा ठायी अक्कनागाई, मिंड मल्लिनाथ, हडपद अप्पण्णा, मोगवाडद केशिराज, कोलशांतय्या आदी करून सकल शिवगण बसवण्णांच्या

Close