उठ लिंगायत युवा…जागा हो !

1 min read

स्वतंत्र लिंगायत धर्म चळवळीच्या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यातील एक अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे ‘लिंगायत स्वाभिमान आणि त्याची सध्याची स्थिती.’ जेव्हा स्वतंत्र धर्माची भाषा केली जाते तेव्हा ज्येष्ठ लिंगायत व नारीशक्ती अगदी उत्स्फूर्तपणे पाठींबा देताना आढळतात परंतु लिंगायत तरुण काहीसा अडखळत आणि संभ्रमात असल्यासारखा वागताना दिसतो. एक तरुण म्हणून लिंगायत धर्मक्रांती मध्ये काम करत असताना मला ही अनास्था अनावश्यक वाटते. नक्की कोणत्या गोष्टीमुळे आमचा लिंगायत तरुण ‘सर्वश्रेष्ठ लिंगायत’ म्हणून समोर येत नाही हे तपासणे खूप आवश्यक झाले. म्हणूनच लिहिण्याचा प्रपंच सुरु केलाय.

सामान्यपणे पहिले तर जी लिंगायत व्यक्ति जी कपाळावर तीन पट्टे लावून सतत कामात मग्न असते तिच्याविषयी समाजात आदर आहे परंतु अलीकडे कामात मग्न असणाऱ्या व्यक्तींची चेष्टा होत असते त्यामुळे कायकात मग्न असणारा लिंगायत धर्मीय सध्याच्या आळशी शहरी संस्कृतीला तितका आदर्श वाटत नाही. लिंगायत आणि कायक विचार आयतखाऊ शहरी मध्यमवर्गाला जरी आवडला नाही तरी कायकात मग्न असणाऱ्या लिंगायत बसवभक्ताला त्याचा काहीही फरक पडत नाही. परंतु, अश्या सामाजिक वातावरणात लिंगायत युवक आपल्या धर्माचे तत्वज्ञान चुकीचे आहे असे समजण्याची शक्यता असते. शेवटी, तरुण मन म्हणजे ओल्या मातीचा गोळा असते. यावर लिंगायत धर्मामध्ये चर्चा होणे आणि प्रत्येक बसवपीठावर चिंतन होणे आवश्यक आहे. आमचा लिंगायत तरुण अजूनही कायक आणि त्यावरील निष्ठा  माननारा आहे आणि तो पुढे येणे आवश्यक आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कपाळावरील भस्माचे पट्टे.  समाजात टिळा लावण्याचे सगळे प्रकार आढळतात आणि प्रत्येक धर्मीय त्यांच्या पद्धतीने वागत असतो. परंतु आमचा तरुण लिंगायत बांधव व भगिनी विभूतीचे पट्टे ओढल्याशिवाय बाहेर फिरताना दिसतात. स्वतःच्या धर्माचे विज्ञान, तत्वज्ञान माहीत नसल्याने स्वाभिमान कमकुवत झाल्याचे हे प्रमुख लक्षण आहे. मी असे मुक्त आवाहन करेन की प्रत्येक लिंगायत तरुणाने इतर कोणताही प्रकार बंद करून फक्त दोन आठवडे भस्माचे तीन पट्टे रोज लावून समाजात वावरून पाहावे. आपण किती मोठे क्रांतिकारी आणि समाजासाठी भूषणावह आहोत हे समाजच आपल्याला सांगेल मग स्वाभिमान जागा होणे अवघड नाही. याला काही वैज्ञानिक कारणे सुद्धा आहेत पण त्याविषयी सविस्तर वेगळ्या लेखात विचार मांडता येतील. मुख्य मुद्दा हाच आहे की लिंगायत असणे आणि भस्माच्या तीन पट्ट्यावरून ती ओळख जगाला समजू देणे हा एक विलक्षण आश्चर्यकारक अनुभव आहे. ठाम मत, कायकावर श्रद्धा, नकारात्मक गोष्टीवर वार अश्या सर्व गोष्टी फक्त तीन पट्ट्यांनी न बोलता कळू शकतात. काही सुशिक्षित लिंगायत म्हणून शकतात की त्यांच्या कॉर्पोरेट जीवनमानात तीन पट्टे चुकीचे वाटत आहेत. परंतु, तसे अजिबात नाही. अगदी मोठमोठे लिंगायत उद्योजक भस्म लावून बोर्डरूम मध्ये वावरत असतात इतकेच काय तर अंतरराष्ट्रीय प्रवासात, विमानतळावर सुद्धा तीन पट्टे लावलेले खूप लिंगायत आपल्याला दिसतील. भस्माचे तीन पट्टे नक्की काय करतात हे स्वतः तपासून बघणे आवश्यक आहे. आपल्या धर्माच्या प्रतीकांना आपण स्वाभिमानाने जर मिरवू शकलो नाही तर आपण कुठल्यातरी गुलामीत अडकलो आहोत हेच सिद्ध होते. आता ती गुलामी कोणती ते लिंगायत युवकाने समजून घ्यायचे आहे.

आणखी एक मोठा लिंगायत स्वाभिमानाशी संबंधित मुद्दा परवा एका वैज्ञानिक दृष्टीच्या व्यक्तिसोबत बोलताना जाणवला. मी जेव्हा लिंगायत धर्माविषयी चर्चा करायला सुरवात केली तेव्हा ‘क्रांतिकारी धर्म’ हा शब्द वापरला तेव्हा त्यांनी समाजात आढळणाऱ्या लिंगायतांचा अपमान करणाऱ्या काही गोष्टींची माहिती दिली. त्यात कुत्सितपणे बोलण्यात येणारी म्हण म्हणजे ‘लिंग लिंगाळी पुंग पुंगाळी’. लिंगायत हिंसा न करणारे आणि डरपोक आहेत अश्या पद्धतीचे विचार समोर ठेवणारी ही म्हण बरेच लोक वापरताना दिसतात. अर्थात लिंगायत व्यक्तींना हिणवण्यासाठी आणि त्यांचा स्वाभिमान मारण्यासाठी असे शब्दप्रयोग रूढ करणारे लोक भारतात घुसले आहेत हे वास्तव सर्वजण जाणतात. अश्या सामाजिक वातावरणात मग लिंगायत युवक तथाकथित ‘शक्तीवाले’ संघटन शोधण्याचा प्रयत्न करतो आणि नको त्यांचे पाय धुण्यात धन्यता मानतो. हे सगळ अज्ञानापोटी होते हे कोणताही लिंगायत सांगू शकेल. काठीने प्रहार करेन, तलवारीने वार करेन अशी भाषा वचन साहित्यामध्ये वापरणारे आमचे लिंगायत धर्मसंस्थापक असताना ‘लिंग लिंगाळी पुंग पुंगाळी’ सारख्या म्हणी रूढ करणारे लोक निश्चितच लिंगायतांच्या शक्तीने व विचाराने घाबरले असल्याने कोणाच्यातरी पदराआडून असल्या म्हणी प्रसारीत करत असणार हे उघड आहे. परंतु आपला सक्षम इतिहास न समजून घेता लिंगायत युवक भरकटत जातो आणि न्यायचे लिंगायत तत्वज्ञान विसरून जातो. शाकाहार करणारे जेव्हा हिंसेवर उतरतात तेव्हा ती हिंसा कोणत्याही मानसिक आजारातून किंवा मांसाहारामुळे तयार झालेल्या विचारसरणीतून आलेली नसते तर ती फक्त आणि फक्त न्यायाच्या आणि तत्वाच्या शक्तीतून आलेली असते हे अगदी साधे तत्व आहे. म्हणूनच की काय लिंगायतांचा स्वाभिमान खचून जाईल अश्या म्हणी आणि नकारात्मक सामाजिक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न केले जातात.

लिंगायत म्हणून आम्ही हिंसेचे समर्थन करत नाही कारण आम्ही अहिंसक समाजाचा पुरस्कार करतो याचा चुकीचा अर्थ काढणे म्हणजे लिंगायत धर्माला काहीही करून हिणवणे असाच आहे. लिंगायत धर्माला कधीच हिंसक धर्म म्हणून समोर यायला आवडणार नाही. त्यामुळेच लिंगायत धर्माचे पारंपारीक विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने लिंगायत धर्मियांचा स्वाभिमान दुखावण्याचे प्रयत्न करत असतात. परंतु अजूनही विरोधकांना यश मिळू शकले नाही कारण बसव तत्वांची ताकद आणि लिंगायत धर्माची शक्ती. इतके शतके जाऊनही आपण अजूनही अवैदिक लढा सुरु ठेवला आहे आणि वाढवला हेच आपल्या स्वाभिमानाचे मुख्य सूत्र आहे. धर्म – राज्यव्यवस्था – विज्ञान – कायक असा एकात्मिक सर्वांगीण धर्म देणारे बसवन्ना हे फक्त महान दार्शनिक नव्हते तर ते कुशल न्याय व नीती तज्ञ होते. संपूर्ण क्रांतीची राज्य व धर्म व्यवस्था उभारणारे नव्हे तर कृतीतून दाखवून देणारे महान योद्धा होते ज्यांना बौद्धिक विकासाचे जितके महत्त्व माहीत होते तितकेच तलवारीच्या वाराची जाणीव आणि संवेदनशीलता होती. त्या महान परंपरेचे आपणही पाइक आहोत यापेक्षा आणखी काय हवे आपला लिंगायत स्वाभिमान समजून घ्यायला ? शाकाहारी तलवारीची ताकद आणि सगळे जग आळशी बनून पृथ्वीची हानी करत असताना कायकाचा आदर्श समोर ठेवणारा लिंगायत धर्म आणि त्याचा अभिमान यापेक्षा जास्त काय हवे आपल्या लिंगायत अस्तित्वाला?

 

 

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही. सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.


 

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
लिंगायत धर्ममान्यता: युवकांची भूमिका

  " देवलोकांचा देव बसवण्णा,    मत्सलोकांचा देव बसवण्णा,    नागलोकांचा देव बसवण्णा,    मेरू मंदोदरीचा देव बसवण्णा,    चन्नमल्लिकार्जुना

Close