लिंगायत धर्ममान्यता: युवकांची भूमिका

1 min read

 

” देवलोकांचा देव बसवण्णा,

   मत्सलोकांचा देव बसवण्णा,

   नागलोकांचा देव बसवण्णा,

   मेरू मंदोदरीचा देव बसवण्णा,

   चन्नमल्लिकार्जुना तुमचा आमुचा देव बसवण्णा,

    तव शरणांचा देव बसवण्णा.”

                                                   ~ वैराग्यनिधी अक्कमहादेवी

या विश्वात समता प्रस्थापित करणारे, सर्व समाजाला एकाच समानतेच्या धाग्यात बांधणारे, बंधुतेची शिकवण देणारे, “कायकवे कैलास” हा मूलमंत्र देणारे, दासोहाच्या संकल्पनेतून आर्थिक, सामाजिक समानता प्रस्थापित करणारे म. बसवण्णा  आणि शरणगण.

आजचा युवक आणि लिंगायत धर्मतत्व

आजच्या लिंगायत युवकाला लिंगायत धर्मतत्व माहीत नाही किंवा ते पर्यायाने ते त्यांच्यापर्यत पोहचले नाही. आजचा युवक आम्हांला पाश्चात्य संस्कृतीचे आचरण करत असताना दिसत आहे.  यामध्ये युवकांचा सर्वस्वी दोष आहे असे म्हणता येणार नाही कारण आमचे धर्मग्रंथ वचनसाहित्य आणि धर्मतत्वे कन्नड भाषेत होती ती इतर भाषेत भाषांतरित होण्यासाठी सुमारे ९००  वर्षाचा कालखंड लागला. आजची परिस्थिती पाहता आजचे मातापिता लिंगायत धर्मतत्वाच्या बाबतीत अनभिज्ञ आहेत. लक्ष्मण महाराज म्हणतात, ” बाप होता ज्ञानी । म्हणोनि लागलो या ध्यानी ।।” पण आजचे बापच मुळात अज्ञानी आहेत  त्यामुळे मुलांना धर्मतत्व माहीत असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

आज मी म्हणतो म्हणून किंवा दुसरे कोणी म्हणतात म्हणून किंवा कोणत्या तरी धर्मग्रंथात आहे असे म्हणून विश्वास ठेवण्याची किंवा स्वीकारण्याची गरज नाही. प्रत्येक विचार आपल्या बुद्धीच्या पातळीवर तपासून पाहणे आवश्यक आहे.  नेमका हाच विचार १२ व्या शतकात म. बसवण्णांनी जनमाणसात रुजविला. महात्मा बसवण्णांचा विचार करता आजही समाजाला अभिशाप म्हणून लागलेली  जातीयता, अस्पृश्यता, लिंगभेद, पुरोहितशाहीच्या नावाखाली गोरगरीबांची केली जाणारी फसवणूक या सर्वांना प्रथमतः मोडीत काढून लिंगायत नावाची स्वतंत्र अवैदिक धर्मव्यवस्था निर्माण करण्याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते महात्मा बसवण्णांनाच. म्हणून आजच्या युवकांनी लिंगायत धर्म स्वतः समजून घेणे खूप गरजेचे आहे. तर आणि तरच ते स्वतंत्र धर्ममान्यतेची क्रांतीची मशाल ते पुन्हा पेटवू शकतील. भारताच्या स्वातंत्र्यापुर्वी स्वतंत्र असणारा लिंगायत धर्म स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने पारतंत्र्यात गेला असेच म्हणावे लागेल.

आजच्या युवकांचे आदर्श: बसवण्णा आणि चन्नबसवण्णा

आज युवक ज्या क्षेत्रात काम करतो तेथील यशस्वी व्यक्तीकडेच तो त्याचे आदर्श म्हणून पाहत आहे. आज आम्हाला अनुयायी निर्माण करण्याची गरज नाही तर आदर्श घडविण्याची गरज आहे. ” We don’t need followers we need ideals.”   आजच्या युवकांसाठी म. बसवण्णा आणि चन्नबसवण्णा आदर्श  आहेत तर ते कसे हे पण सांगावे लागेल.

वयाच्या आठव्या वर्षी मुंज नावाचा वैदिक संस्कार नाकारुन  प्रस्थापित समाजव्यवस्थेला धक्के देणारे बसवण्णा,  वर्ग- वर्ण- लिंग-जातीनिहाय स्वतंत्र अवैदिक समाजव्यवस्था  निर्माण करणारे म. बसवण्णा, अनुभवमंटप  नावाची जगातील पहिली संसद निर्माण करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते म. बसवण्णा.

वयाच्या आठव्या वर्षी समाजजीवनाचे अवलोकन करून समाजाला धडे देणारे वचनसाहित्य निर्माण करणारे चन्नबसवण्णा, कल्याणच्या अनुभवमंटपाचे दुसरे अध्यक्ष चिन्मयज्ञानी चन्नबसवण्णा, कल्याणच्या प्रतिक्रांतीनंतर वचनसाहित्य सुरक्षितपणे कल्याणपासून उळवीला घेऊन जाण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारे चन्नबसवण्णा. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी हुतात्म्य पत्करणारे गणाचारी चन्नबसवण्णा.

म्हणूनच, आजच्या युवकांचे आदर्श बसवण्णा आणि चन्नबसवण्णा आहेत. आजच्या युवकांनी ध्येयवादी होणे, निर्भीड होणे गरजेचे आहे.

ध्येयाच्या वेदना मनास होऊ दे,

वार तुझा प्रत्येक क्षणास होऊ दे,

अशक्य सुद्धा म्हणेन शक्य आहे ,

इतका गर्व तुझ्या बुद्धीच्या मी पणास होऊ दे.

इतर धर्म आणि लिंगायत धर्मातील युवक

लिंगायत धर्म आणि इतर धर्म यांचा विचार करता लिंगायत धर्मातील सुशिक्षित युवक आणि बौद्ध व इस्लाम धर्मातील सुशिक्षित युवक वगळता युवकांना धर्मविषयी ज्ञान आणि आस्था नाही.पण हे चित्र हळूहळू बदलत असताना आपल्याला दिसत आहे. लिंगायत सेवा संघ, बसव ब्रिगेड, वचन अकॅडमी, बसव मिशन, महाराष्ट्र बसव परिषद या संस्था संघटनांच्या माध्यमातून युवक शरण चरित्र, वचनसाहित्य आणि धर्मतत्वे यांचा अभ्यास करत आहेत आणि ते प्रत्यक्षात आचरणात आणत आहेत. आज वचनसाहित्य आणि शरणचरित्र  फक्त अभ्यास करण्याची गोष्ट नाही तर ती  आचरणात आणण्याची गोष्ट आहे.

आज तरुणांनी शरणचरित्रे आणि वचनसाहित्य वाचणे काळाची गरज बनली आहे. मात्र शरणचरित्र वाचताना व्यक्तीच्या मनात भक्ती असावी, कायक-दासोह-समता- समानता-बंधुता या पंचसूत्रीवर त्याचे प्रेम असावे, तो व्यक्ती थोडासा विद्रोही असावा. येथे थोडासा विद्रोही हा शब्द मुद्दाम वापरला कारण संपूर्ण विद्रोही व्यक्ती नास्तिकतेकडे झुकलेला असतो. आम्हांला नास्तिक नाही तर आस्तिक लिंगायत निर्माण करायचा आहे.

आमच्या नाण्याला नेहमी दोन बाजू आहेत , एक छापा आणि दुसरा काटा. मात्र शरणांच्या नाण्याला दोन्ही बाजू सारख्याच आहेत. दोन्हीही छापा. म्हणून शरण चरित्र समजून घेत असताना भक्तिमार्गी शरण आणि विद्रोही शरण या दोन्ही शरणांचा अभ्यास करावा लागेल. आता बसवण्णांचाच विचार घ्या.

    ” जगविस्तार नभविस्तार,

विस्तारातीत तव विस्तार,

ब्रम्हाडापलीकडे तव श्री मुकुट,

पाताळापलीकडे तव श्री चरण,

अगम्य अगोचर अप्रतिम लिंगय्या,

कुडलसंगमदेवा,

आजि माझिया करस्थळी येऊनी, इवलासा झालास.”

अशा वाक्यात परशिव ईशाचे वर्णन करणारे भक्तिभंडारी बसवण्णा.

             ” वेदावर तलवार चालवेन,

शास्त्रांना साखळदंडाने बांधेन,

पुराणांच्या पायात बेड्या घालेन,

आगमांचे नाक कापेन,

तर्काच्या पाठीचे चांबडे काढेन,

हे महादानी कुडलसंगमदेवा,

तव घरचा पुत्र असे मी.”

या वाक्यात विद्रोह करणारे म. बसवण्णा. या शरणांच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास केला पाहिजे. आजचा युवक सोशल मिडियात अडकून पडलेला आहे . म्हणूनच या सोशल मिडियाचा वापर करून  युवकांनी अधिकाधिक संक्षिप्त शरण चरित्रे वचनसाहित्य प्रसारित करावेत. आजच्या युवकांच्या बरोबरीने युवतींची भूमिका तितकीच महत्वाची आहे. पुरुषापेक्षा स्त्रीचा मेंदू वजनाने मोठा असतो म्हणतात. आजच्या युवती सुंदर साहित्य निर्माण करू शकतात, आजच्या युवती वचनावर सुदंर कथ्थक सारखे अवघड नृत्य करू शकतात. आपल्या सुदंर मधुर आवाजात वचनाचे गायन करू शकतात.  वचनाचे सुंदर विश्लेषण करू शकतात. आमच्या युवतीच्या समोर माता क्कनागलांबिका, अक्कमहादेवी पासून अलीकडच्या काळातील माते महादेवी पर्यत आदर्श आहेत. आज अशाप्रकारच्या युवतीं समाजात घडत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे  साहित्यक्षेत्रातील श. मानिषाताई हिरेमठ, श. शालिनीताई दोडमनी, श जयदेवीताई लिंगाडे, श. शशिकला मडकी तर कथ्थक नृत्यविशारद श. शिवप्रिया लंबे ही चालू घडीची उदाहरणे आहेत.  आज आमच्या युवक आणि युवतीतून उत्तम साहित्यिक, लेखक, वक्ते, संघटक,  संशोधक, शस्त्रतरबेज, बहुभाषिक  संशोधक, वक्ते, लेखक तयार झाले पाहिजेत यासाठी प्रत्येक युवकांनी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे.  आव्हाने पेलण्याची ताकद आमच्या तरुणांत नक्कीच आहे, नव्हे तर ती फक्त त्यांच्यातच आहे, गरज आहे ती फक्त इरसेस पेटून उठण्याची.

बाराव्या शतकातील शरणांची वचने एकविसाव्या शतकाला मार्गदर्शक

बाराव्या शतकात बसवादि शरणांनी सांगितलेला  कायक सिध्दांत आज बेरोजगारी नाहीशी करू शकतो. शरणांची सामाजिक वचने प्रबोधन करू शकतात. शरणांचा दासोह सिध्दांत एखाद्या गरीब विध्याथ्याचे शिक्षण, वृद्धांचा औषधोपचार पूर्ण करू शकतो.  फक्त एवढेच नाही तर शरणांना वचनातून कसे रहावे, कसे वागावे, कसे बोलावे हे देखील वचनातून शिकविले. म. बसवण्णा म्हणतात,

 

               ” बोलणं मोत्यांच्या हारासारखे असावे,

बोलणं मणिकाच्या दिप्तीसारखे असावे,

बोलणं स्पटीकाच्या शलाकेसारखे असावे,

बोलणं प्रत्यक्ष लिंगानेही प्रशंसा करावी असे असावे,

पण बोलल्याप्रमाणे वागले नाही तर कुडलसंगमदेव कसा प्रसन्न होईल.

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही. सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.जाहिरात

मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड


 

 

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
बसवकल्याण – एक प्रेरणास्थान : वैराग्यनिधी अक्कमहादेवीचे वचन

कल्याण नगर पाहुन महादेवी अक्कांनी केलेले वर्णन: जाता येईना कोणालाही कल्याणा, नच जाता येई असाध्य हे जाणा, आशा, आमिष नष्ट

Close