मन्मथ स्वामी आणि वाङमय

1 min read

असे भूवरी ते कपिलाख्या क्षेत्र ।

वसे त्या ठिकाणी गुरू जो पवित्र ।।

असे मन्मथ स्वामी हो नाम ज्याचे ।

करा वारी वेगे पहा वर्म त्याचे ।।

कपिलापुरी पुण्यभूमी पवित्र ।

तिथे  नांदतो मन्मथस्वामी सुपात्र ।।

तया आठविता महापुण्यराशी।

नमस्कार  माझा सद्गुरू मन्मथेश्वरासी ।।

बाल ‘मन्मथ’ ते ‘मन्मथ स्वामी’ : विलक्षण प्रवास

बाराव्या शतकामध्ये  बसवादी शरणांच्या विचारातून लिंगायत धर्माचा  उदय झाला.  महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रप्रदेश या भागात लिंगायत धर्माचे अनुयायी निर्माण झाले. सोळाव्या शतकापर्यंत लिंगायत धर्म मरगळ आल्यासारखा झाला, नेमकं त्याच वेळी शिवयोगी मन्मथ स्वामींचा जन्म झाला, पिता शिवलिंग स्वामी आणि माता पार्वतीदेवी यांच्या उदरी माघ शु. तृतीया या दिवशी मन्मथ स्वामींचा जन्म झाला.

आई वडिलांच्या, गुरूच्या शिकवणीत आणि मन्मथ स्वामी  दिवसेंदिवस वाढत होते, समाज जीवनाचे ते निरीक्षण करू लागले. जस जसं मन्मथ स्वामींच वय वाढत होते तसे मन्मथचा कवित्वाकडे कल वाढला. छोट्या काव्याची रचना मन्मथ करू लागले.  असे काही दिवस गेले आणि छोट्या मन्मथ माऊलीचे रूपांतर एका उत्तम लावणीकारात झाले. आता मात्र शिवलिंग स्वामींना मन्मथ स्वामींची चिंता वाटायला लागली.  शिवलिंग स्वामी मन्मथाला घेऊन मानूर येथील गुरू बसवलिंग स्वामी यांच्याकडे जात आणि त्यांच्या प्रभावाने मन्मथ स्वामींचे मन परिवर्तन झाले, एका लावणीकारांचे रुपांतर एका उत्तम संतकवीमध्ये झाले. मन्मथ स्वामींनी अनुभवानंद, गुरुगीता, परमरहस्य, शिवगीता या ग्रंथाचे लेखन केले. पुढे मन्मथांना अनेक शिष्य मिळाले. सर्व शिष्यासह त्यांनी पंढरपूर, बार्शी, सोलापूर या तीर्थांची यात्रा केली. त्या यात्रेदरम्यान मन्मथ स्वामींनी समाजाचे निरीक्षण केले आणि दांभिकपणावर अभंग लिहिले.

त्यांचे काही अभंग:

शिवभक्ताचे कुळी जन्मूनी करंटा ।

न भजे चोरटा शंकरासी ।

छपवुनी लिंग घाली तुलसीमाळ ।

जन्माला चांडाळ मातेगर्भी ।।

सांडोनी भस्माते लावितो चंदन ।

तयासी बंधन यम करी।।

भाळी भस्म  लिंग गळा । शोभे रुद्राक्षांच्या माळा ।।

मुखी मंत्र पंचाक्षर। धन्य धन्य ते शरीर ।।

तीर्थव्रतासी आधार । महादोषांचा संहार।।

त्याचे झालिया दर्शन। पापी उद्धरिती जन ।।

मन्मथ म्हणे हेच खरे । भु ईश्वरे अवतरे ।।

गुरू आणि लिंग, जंगमांची सेवा ।देई मज देवा जन्मोजन्मी ।।

रुद्राक्षांच्या माळा भस्म लावू भाळी । हेचि चंद्रमौळी देई मज ।।

तीर्थ आणि प्रसाद, मंत्र षडक्षर ।ध्याऊ उमावर जन्मोजन्मी ।।

मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण। हेचि अष्टावरण.

काय कैलास करावे । मुखी शिवनाम घ्यावे ।।

काय कैलास करावे । मुखी घ्या रे शिवनाम ।।

अहो शिवनामापुढे । काय कैलास बापुडे ।।

काय कैलासाची चाड । मन्मथ म्हणे शिव गोड ।।

मन्मथ स्वामींचे चरीत्र मोठे विलक्षण आहे. त्यांच्या चरित्रात चमत्कारकथा नाहीत. परंतु ‘विठ्ठल-विठ्ठल’ जयघोष करणाऱ्या शिवभक्तांच्या वंशजाना त्यांनी ‘शिव-शिव’ म्हणायला भाग पाडले. “तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा ।|” असे म्हणणाऱ्या जिव्हेला त्यांनी “माझे जीवीचे जीवन । देव पार्वतीरमण।|” असे गायला शिकविले. “शिव नाद शिव छंद । वाचे शिव स्मरावा। शिव अवघा प्रेमानंद। सदाशिव स्मरावा ।।” असे शिवनामचे महात्म्य पटवून देऊन डोलायला लावले. हेच त्यांच्या चरित्रातील चमत्कार आहेत.

शिवभक्ताच्या वंशजाने गळ्यात तुळशीमाळ घातलेली पाहून मन्मथ स्वामीना संताप येत. शिव आणि विष्णु एकाच परब्रम्हतत्वाची भिन्न नामरूपे आहेत. परंतु धर्मचरणात एकदेवता व एकनिष्ठा असावी लागते. म्हणून शिवभक्ताच्या कुलात जन्म असल्यास शिवाचीच भक्ति करावी, असा मन्मथ स्वामींचा आग्रह आहे.

शिवयोगी मन्मथ माउलींचे काही अभंग:

यज्ञयागाचा तिरस्कार करताना मन्मथ स्वामी म्हणतात,

यज्ञाच्या वाटा टाकल्या मोडोनी। तीर्थलागी जाणे खुंटविले।।

मन्मथ शिवलिंग म्हणे एक वेळा । भक्ताचा सोहळा घरोघरी ।।

मन्मथ स्वामी तीर्थयात्रा, नानाविध उपासना यांचे खंडन करतात,

तीर्थ व्रत दान अष्टांगदि योग। आचरिता भोग न चुकेचि ।।

नानादेवतांचे केलिया पूजन । अनन्यता तेणे नष्ट होय ।।

नर नारी सकळीका । येथे अधिकार असे देखा ।।

तेथे वर्णाश्रमाचा उपसा। काढू नये पै ।।

स्त्रिया लिंगपूजा करिती । त्यासी नसे हो अधोगती ।।

दिक्षावंत सती पवित्र असती । लिंगायत धर्मनिष्ठ ।।

ऐसी जी लिंगपूजा श्रेष्ठ । सकल ब्रम्हांडी बलिष्ठ ।।

तेथे नसे कधीं अनिष्ट । ग्रहदशा जाणं पा ।।

ज्यासीं नाहीं शिवाचार। त्यानें पुजिजें स्थावर।

ज्याचें हृदयस्थळीं शंकर। त्यानें स्थावर पुजूं नये।।

इष्टलिंग लोळतसे उराखालीं। अन्य स्थावरां दंडवत घाली।

त्याचें मुख देखतां अंघोळी। वस्त्रांसहित करावी।।

अमान्य करुनी हृदयीचे लिंग । जो धरी स्थावरी भक्त अंग ।।

तो शिवभक्त नोहे केवळ सोंग । बहुरूपियाचे ।।

गळां असोनिया त्रिनयन। जो अन्य देवताचें करी उपासन।

तो भवीहून परता जाण। लिंगनिष्ठा नाहीं म्हणोनिया।।

इष्टलिंग लोळतसे उरावरी । अन्य देवा नमस्कार ।।

महापाप तया जोडे । तेणे अधपाती पडे ।।

करीता दुजेठायी रति । तेणे पडे अधपाती ।।

अंग लिंगासी अर्पिले। तेव्हा तयाचेची जाहले ।।

मन्मथ म्हणे नेणती वर्म । न पाहती धर्माधर्म ।।

लिंग म्हणे धोंडा, धोंडा । किडा पडो त्याच्या तोंडा ।।

लिंग म्हणे खडा , खडा । होय जन्मोजन्मी वेडा ।।

लिंग म्हणे जो पाषाण । त्याच्या मुखी कीटक जाणं ।।

मन्मथ म्हणे ऐशा नरा । मोजुनि माराव्या पैजारा ।।

शिवनाद शिवछंद ।  वाचे शिव स्मरावा ।।

शिव अवघा प्रेमानंद । सदाशिव स्मरावा ।।

शिव हृदयी रात्रंदिन । मुखी ध्यान सदाशिव ।।

शिव सुखा शिव दुखा। मन्मथ मुखा सदाशिव ।।

शिव शिव म्हणता वाचे।  काय गेले तुझ्या बा चे ।।

शिवनाम असे श्रेष्ठ । पापी उद्धरीती नष्ट ।।

शिवनाम घेता वाचे । दोष जाती वैष्णवांचे ।।

शिवावाचून आहे कोण । विठ्ठल मस्तकी शिव जाण ।।

मन्मथ शिवलिंग म्हणे । शिवा वाचून व्यर्थ जीणे ।।

काय केले रांड लेका। जन्म गमविला फुका ।।

नाही केले बा साधन । काय माड्या ह्या बांधून ।।

नाही अर्चिले शंकरा । पैका वेचिल्या संसारा ।।

नाही पूजिले अतिथी । सदा स्त्रियांची संगती ।।

म्हणे मन्मथ शिवलिंग । बोलो जाता येतो राग ।।

 

जीवनाचे ध्येय पूर्ण झाल्यावर शके १५३५, भाद्रपद शु. तृतीया या दिवशी मांजरसुब्यापासून तीन किलोमीटर अंतरावर तीन डोंगराच्या कपारीत, झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याच्या साक्षीने, हिंस्त्र श्वापदांच्या सहवासात, पक्षांच्या किलबिलाटात, एकांतवासात मन्मथ माउलींनी समाधी साधली. लिंगायताना त्यांच्या तत्वांचे आचरण शिकविणाऱ्या मन्मथ माउलींच्या समाधीचे दर्शन घ्यावे .

या रे, या रे, सारेजण। डोळा पाहू कपिलाधार ।।

अरे, आलिया संसारी। जाई  वेगीं  कपिलाधारी ।।

पाहता मन्मथ समाधी । दूर होती आधी व्याधी  ।।

दीनोध्वरांचे दर्शन । घेता पापे होती दहन ।।

बसवदास म्हणे देख। प्राप्त होई सर्व सुख ।।

संदर्भ:

१. मराठी संत साहित्यातील बसवण्णा : राजू जुबरे. प्रकाशन : महाराष्ट्र बसव परिषद

२. शरण जीवन दर्शन : राजू जुबरे. प्रकाशन : महाराष्ट्र बसव परिषद.

३. भजनावली,  संस्कृती प्रकाशन.

फोटो सौजन्य: www.panoramio.com

लेखक: अभिषेक देशमाने

पार्श्वनाथ नगर , सांगली रोड, नांद्रे, तालुका-मिरज, जि. सांगली.

इमेल: abhishekdeshmane7019@gmail.com

मोबाईल: ९८२२०५४२९१

© अभिषेक देशमाने, २०१७. लेखकाचे संमतीने पुनर्प्रकाशित.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही. सर्व कायदेशीर जबाबदारी लेखाकाधीन.जाहिरात

मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.


Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
‘शरण-शरणी’च्या हृदयातील हृदयस्पर्शी महात्मा बसवण्णा

विश्वगुरु, समतानायक, लिंगायत धर्म संस्थापक, महानायक,जगतज्योती महात्मा बसवण्णा हे मध्ययुगीन कालखंडातील एक प्रकाशमान तारकामंडल की ज्यांच्या प्रकाशात सबंध विश्वात सामाजिक,धार्मिक,आर्थिक,राजकीय

Close